Close

महसूल संबंधित व्‍याख्‍या 171 ते 180

 १७१. 'क्षेत्रबुक' म्‍हणजे मोजणी अंती भूमापन क्रमांकाचे परिमाणात काढलेले रेखाचित्राचे क्षेत्र समाविष्ट असणारे मोजणीचे पुस्तक. यात धारकाचे नांव, सर्व्हे नंबर व त्याचे क्षेत्र, चालता नंबर, इ. बाबी नमुद असतात.

 

१७२. 'वसलेवार बुक' म्‍हणजे भूमापन क्रमांकाचे क्षेत्र काढण्यासाठी, त्‍या भूमापन क्रमांकाची काटकोन, त्रिकोण व समलंब चौकोनात विभागणी करुन मोजमापाच्या सहाय्याने क्षेत्र गणना करण्याची पध्दत म्हणजे वसलेवार.

मोजणी केलेल्या भूमापन क्रमांकाची शंकु पध्दतीने त्रिकोण आणि समलंब चौकोनामध्ये विभागणी करुन, निश्चित परिमाणात मापे टाकण्यात येवून, गणितीय पध्दतीने प्रत्येक त्रिकोणाचे क्षेत्र नमुद करण्यात येते. अशा मोजणी केलेल्या सर्व भूमापन क्रमांकाची नोंद ज्या नोंद वहीत केलेली असते, त्या नोंदवहीस वसलेवार बुक असे म्हणतात.

 

१७३. 'बागायत तक्ता' म्‍हणजे बागायत सर्व्हे नंबरसाठी तयार केलेला तक्ता. हया तक्त्यात वर्गीकरण करताना जी माहिती सर्व्हेअरने प्राप्त करुन घेतली, ती सर्व हयात नमुद केली जाते. विहीरीची नोंद, सर्व्हे नंबरच्‍या हद्दी व हद्दीच्या निशाण्या (खुणा) तपासुन लिहून घेतात. वर्गकार सुध्दा प्रत्येक सर्व्हे नंबरची नोंद ठेवतात. त्या सर्व्हे नंबरचे गावापासूनचे अंतरही नोंदवतात. गाव नकाशा व गाव नोंदवही तयार करतात व ओलीताचे/पाण्याची साधने कोणकोणती आहेत. त्यांची नोंद त्यात करतात. तलाव, वोडी, कुंटा या पासुन शेतीला पाणी मिळते किंवा नाही याच्या नोंदी ठेवल्या जातात.

 

१७४. 'आकार बंद' म्‍हणजे गावातील प्रत्यक्ष जमिनीची भूमापन मोजणी व जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भूमापन क्रमांकाचे क्षेत्र वसलेवार पध्दतीने काढले जाते. क्षेत्र काढताना जिरायत, बागायत, तरी (भातशेती) इत्यादी वेगवेगळे क्षेत्र नमुद केले जाते. त्याप्रमाणे (गाव नमुना एक) आकारबंद तयार केला जातो.

एखादया गावाचे एकूण क्षेत्र, भूमापन क्रमांक किंवा गट क्रमांक, त्यांचे प्रत्येकी क्षेत्र, आकार, लागवडीचे क्षेत्र, पोटखराबा, सत्ताप्रकार, प्रतवारी, जमिन महसूल आकारणी, जमाबंदीची मुदत तसेच एकूण क्षेत्र कोणकोणत्या प्रकाराखाली किंवा प्रयोजनासाठी वापरात आहे, त्याचा तपशील दर्शविणारा गाव नमुना एक म्हणजे आकारबंद. आकारबंदामध्ये गावचे एकुण क्षेत्र, लागणी लायक, खराबा त्याचा आकार या नोंदी केल्या जातात.

आकारबंदाच्‍या शेवटच्‍या पानावर संपूर्ण भूमापन क्रमांकाच्या क्षेत्राची/ आकाराची बेरीज, जमिनीच्‍या वेगवेगळया प्रकारनिहाय दर्शविलेली असते. तसेच गावठाण, नदया, नाले, शिवेवरील भाग, ओढा, रस्ते, कॅनॉल, तलाव, रेल्वे, इ. क्षेत्राचा वेगळा उल्लेख असतो आणि शेवटी वर उल्लेख केलेल्या सर्वांचे क्षेत्राची एकत्रीत बेरीज केलेली असते. त्यास 'जुमला बेरीज' असेही म्हणतात.

 

१७५. 'गावचे नकाशे' म्‍हणजे भूमापन अभिलेख. यात गावचे सर्व भूक्रमांक दर्शविलेले असतात. गाव नकाशा

एक इंच = २० साखळी किंवा १० साखळी या परिमाणात काढला जात होता. दशमान पध्दत सुरु केल्यानंतर मोजणी प्रमाणित दशमान साखळीने केली जाते आणि गावनकाशे १:५००० व १:१०००० या परिमाणात तयार केले जातात. गाव नकाशा मध्ये गावातील गावठांण, झाडे, विहिरी, डोंगर, टेकडी, ओढा, ओघळी, गाडी रस्ते, पांळंद रस्ते, पक्के रस्ते, झुरी इ. बाबी नमुद असतात. गाव नकाशाच्या आधारे एखादया गट नंबरच्या किंवा गावाच्या दिशादर्शक चतु:सिमा समजून येतात. ज्या गावामध्ये एकत्रीकरण योजना अंमलात आली अशा गावामध्ये सर्व्हे नंबर ऐवजी एकत्रीकरणानंतर त्यास गट नंबर असे संबोधले गेले.

 

१७६. 'अधिकार अभिलेख' म्‍हणजे वऱ्हाड क्षेत्रात सर्व्हे नंबर नुसार कब्जेदारांचे हक्काचे अधिकार अभिलेख त्यांच्‍या कब्जातील क्षेत्रनिहाय तयार करणेत आले. मध्य प्रांतात (नागपूर विभागामध्ये) 'खसरा पत्रक' तयार करणेत आले. मराठवाडयात सुध्‍दा 'खासरा पत्रक' तयार करणेत आले. पश्चिम महाराष्ट्रात 'कडई पत्रक' तयार करणेत आले. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनयम १९६६ लागू झाल्यानंतर अधिकार अभिलेख म्हणून सात-बारा अंमलात आला.  सात-बारा हा मूळ महसूल अभिलेख असून, महाराष्ट्र जमिन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम ३,,६ आणि ७ नुसार सात-बारा तयार केला जातो.

 

१७७. 'फाळणी नकाशे' म्‍हणजे एखादया भूमापन क्रमांकाचे रितसर हिस्से पाडण्यासाठी जागेवरील वहिवाटीची मोजणी करुन तयार केलेला नकाशा म्हणजे फाळणी नकाशा होय. फाळणी नकाशे हे सन १९५६ पर्यंत शंकुसाखळीने तयार केले गेले.  त्यानंतर ते फलकयंत्राच्‍या साहाय्याने तयार केलेले आहेत. फाळणी नकाशा आधारे पोटहिस्स्यांच्या गहाळ खुणांची स्थिती निश्चित करता येते. हद्दीचे वाद मिटविता येतात. ज्या भूमापन क्रमांकामध्ये पोटहिस्से पडलेले आहेत त्यांच्‍या हिस्स्याप्रमाणे असलेल्या हद्दी योग्य त्या स्केलाप्रमाणे कायम करुन, यामध्ये भूमापन क्रमांकाच्या हद्दी काळया शाईने व पोटहिस्याच्या हद्दी तांबडया शाईने दर्शवून त्यात त्या- त्या पोटहिस्स्याचा क्रमांक नमुद केलेला असतो.

 

१७८. 'गुणाकार बुक' म्‍हणजे एखादया भूमापन क्रमांकामध्ये किंवा गटामध्ये कोणत्याही कारणामुळे हिस्से पाडले जातात तेव्हा मोजणीवेळी गुणाकार बुक (हिस्सा फॉर्म नं.४) भरला जातो. संबंधित जमीन धारकाने दर्शविल्याप्रमाणे वहिवाटीप्रमाणे पोटहिस्स्यांची मोजणी करुन आलेले क्षेत्र रकाना क्रमांक ६ मध्ये लिहिण्यात येते. त्यानंतर सर्व्हे नंबरच्या एकुण क्षेत्राशी मेळ ठेवण्यासाठी क्षेत्र कमी अधिक रकाना क्रमांक ८ व ९ मध्ये भरुन सर्व्हे नंबरचे एकुण क्षेत्र रकाना क्रमांक १० मध्ये कायम केले जाते. त्यावेळी प्रत्येक हिस्साच्या खातेदारांचे नाव/हजर असलेबाबत अंगठा किंवा स्वाक्षरी (रकाना क्रमांक १२ मध्ये) घेतली जाते. यामध्ये ज्या भूमापन क्रमांकाचे हिस्से करावयाचे आहेत त्यामध्ये खाष्टे पाडून अथवा त्रैराषिक पध्दतीने क्षेत्रफळ काढले जाते. पोटहिस्सा मोजणी करत असताना जमिन एकत्रीकरण योजना १९४७ च्या नियमास अधिन राहून विहीत केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमीचा हिस्सा / तुकडा पडणार नाही अशा रितीने जमिनीची विभागणी केली जाते. एकंदरीत सर्व्हे नंबर अथवा गट नंबर मध्ये जेव्हा विभागणी होते, तेव्हा मोजणी समयी जागेवर करावयाच्या / भरावयाच्या तक्त्याला गुणाकार बुक असे म्हणतात.

 

१७९. 'कब्‍जेहक्‍काची रक्‍कम किंवा भोगाधिकार मूल्‍य' म्‍हणजे एखाद्‍या व्‍यक्‍तीस जेव्‍हा शासकीय जमिनीचे वाटप केले जाते तेव्‍हा त्‍या जमिनीचा भोगवटा करण्‍याचा अधिकार दिल्‍याबद्‍दल मोबदला म्‍हणून देय असणारी रक्‍कम.  ही रक्‍कम शिघ्र सिध्‍द गणकानूसार (रेडी रेकनर) ठरविली जाते. [महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्‍हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(के)(एक)]

 

१८०. 'जिल्‍हा परिषद उपकर' म्‍हणजे असा उपकर जो जमीन महसूलाबरोबर वसूल केला जातो. हा उपकर मूळ जमीन महसूल आकाराच्‍या ७ पट असतो.


Comments

Content