Close

महसूल संबंधित व्‍याख्‍या 161 ते 170

 १६१. 'अल्‍पभूधारक शेतकरी' म्‍हणजे जो शेतकरी मालक व/किंवा कुळ म्‍हणून एक हेक्‍टर पर्यंत (२.५ एकर) शेतजमीन वहिवाटतो.

 

१६२. 'लहान शेतकरी' म्‍हणजे जो शेतकरी मालक व/किंवा कुळ म्‍हणून एक हेक्‍टर (२.५ एकर) पेक्षा जास्‍त शेत जमीन वहिवाटतो.  

 

१६३. 'दूर्बल घटक' म्‍हणजे दोन हेक्‍टरपेक्षा जास्‍त नाही अशी कोरडवाहू जमीन धारण करणारा (दुष्‍काळ प्रवण म्‍हणून जाहीर क्षेत्रात तीन हेक्‍टर) लहान शेतकरी आणि ज्‍याचे बिगर-शेती वार्षिक उत्‍पन्‍न रु. १३,५००/- पेक्षा जास्‍त नाही.   

 

१६४. 'दारिद्र रेषेखालील व्‍यक्‍ती' म्‍हणजे ज्‍याचे पैसा अथवा माल किंवा अंशत: पैसा आणि अंशत: माल अशा सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्‍पन्‍न ग्रामिण भागात रु. २०,०००/- पेक्षा आणि शहरी भागात रु. २५,२००/- पेक्षा जास्‍त नाही.  

१६५. 'शेतवार पत्रक' म्‍हणजे ज्‍या पुस्तकात भूमापन क्रमांकानुसार क्षेत्र व आकार नमुद केलेला असतो.  

 

१६६. 'कच्चा सुड' म्‍हणजे मुख्‍यत: कोकण विभागात, एकूण क्षेत्र दाखविण्याकामी सुड (पुस्‍तिका) वापराला जातो. त्यामध्ये भूमापन क्रमांक, पोट हिस्‍सानंबर, स्थळाचे नाव, जिरायत, बागायत यांचे क्षेत्र व आकार नमूद असतो.

 

१६७. 'पक्का सुड' म्‍हणजे मुख्‍यत: डोंगराळ भागातील गावासाठी ठेवण्यात येणारी पुस्‍तिका. यामध्ये भूमापन क्रमांक व त्यामध्ये पडलेल्या पोटहिस्स्याची स्केली आकृती असते. तसेच जमिनीचा प्रकार, भूमापन क्रमांक व पोट हिस्स्याचे असणारे खराबा क्षेत्र व आकार नमूद असतो.

 

१६८. 'दरवारी' म्‍हणजे भूमापन क्रमांक, प्रत नंबर, कच्चा व पक्का आकार व क्षेत्र नमूद असणारी पुस्‍तिका.

 

१६९. 'क्लासर रजिस्टर' म्‍हणजे भूमापन क्रमांक / पोट हिस्‍सा नंबर, जमिनीचे प्रकारनिहाय क्षेत्र, पोटखराब, जिरायत, बागायत व तरी याप्रमाणे दर व आकार नमूद असणारी पुस्‍तिका. यात जमिनीची गावापासून व पाण्यापासून असणारी लांबी, मैल यांवरुन कायम एकरी दर काढलेला असतो.

 

१७०. 'प्रतिबुक' म्‍हणजे जमाबंदीच्‍यावेळी प्रतबंदी करतांना, प्रत्येक भूमापन क्रमांकाची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन त्याचे ठराविक चौकोन आखुन त्या प्रत्येक भागाची प्रत ठरविली जाते. प्रत्येक भागाचे / जमिनीचे प्रतिवार निरीक्षण करुन, त्याप्रमाणे विहित नमुन्यात प्रतवारी प्रमाणे भागआणे काढले जातात व त्या भागआणे वरुन नंतर त्याचा एकरी दर कायम करुन, आकार बसविण्याचे काम केले जाते. त्याच्या नोंदी प्रतिबुक नोंदवहीमध्ये करण्यात येतात त्यामध्ये भूमापन क्रमांक, मोजणी नंबर, डागाचे नाव, कर्दाचे नाव, जमिनीचा प्रकार, क्षेत्र, खराबा क्षेत्र, व लागवडी लायक क्षेत्र, इत्यादी नोंदी घेतल्या जातात.


Comments