प्रश्न :-
सात-बारा सदरी बिनशेतीची नोंद घेण्याची पध्दत कशी असते?उत्तर :-
मा. जिल्हाधिकारी, मा. अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रथम तहसिलदार कार्यालयात बिनशेती आदेश पाठविले जातात. अशा वेळेस सदर आदेशाची नोंद सात-बारा सदरी करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
- बिनशेती आदेश प्राप्त झाल्यावर तहसिलदार कार्यालयाने सर्वप्रथम अशा नोंद तालुका नमुना नं. २ मध्ये नोंदवावी.
- तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक सदर बिनशेती आदेशावर नमुद करुन हा आदेश संबंधीत तलाठी यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा.
- तलाठी यांनी खातेदाराकडून परस्पर बिनशेती आदेश घेऊन नोंदी करण्याचे टाळावे. तहसिलदार कार्यालयाकडून, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक असलेल्या आदेशाचीच नोंद फेरफार सदरी नोंदवावी.
- असा फेरफार मंजूर झाल्यानंतरच सात-बाराच्या इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी. बिनशेती ही संपूर्ण क्षेत्रासाठी आहे किंवा अंशत: क्षेत्राची आहे ते स्पष्टपणे नमुद करावे.
- सात-बारा स्वतंत्र करतांना भूमी अभिलेख विभागाकडून क.जा.प. प्राप्त झाल्यानंतरच सक्षम अधिकार्याचा बिनशेती आदेश, क.जा.प. व सनद बघुनच स्वतंत्र सात-बारा तयार करावा. क.जा.प. नुसार गाव नमुना नंबर १ ला दुरुस्ती करावी.
- ओपन स्पेस व रस्ता यांच्या क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी स्थानिक प्राधिकरणाची नोंद करावी आणि ॲमिनिटी स्पेसच्या क्षेत्रासाठी कब्जेदार सदरी मालकाच्या नावाची नोंद करावी.
उदाहरणार्थ: जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र ४० आर आहे आणि पूर्ण ४० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे विवरण म्हणजेच ओपन स्पेस, ॲमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे क्षेत्र व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे. त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी.
- जर एखाद्या जमिनीचे क्षेत्र ४० आर आहे आणि फक्त २० आर क्षेत्राचा बिनशेती आदेश असल्यास फेरफार सदरी तसे नमुद करुन बिनशेती आदेश क्रमांक, तालुका नमुना नं. २ मधील नोंदींचा अनुक्रमांक, क्षेत्राचे विवरण म्हणजेच ओपन स्पेस, ॲमिनिटी स्पेस, रस्ता, रोड साईड मार्जिन यांचे क्षेत्र व प्लॉटचे निव्वळ क्षेत्र नमुद करावे त्यानंतर सात-बारा सदरी इतर हक्कात "बिनशेती" अशी नोंद करावी आणि बिनशेती जितक्या क्षेत्रासाठी आहे ते क्षेत्र नमुद करावे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in