उत्तर: जमाबंदी आधी तलाठी यांनी:
- गाव नमुना ८-अ (खातेदारांची नोंदवही) तपासून, खातेदाराने जमिनीची खरेदी/विक्री केली असल्यास जमीन महसूल व स्थानिक उपकरातील बदल केला असल्याची खात्री करावी.
- गाव नमुना ८-ब (वार्षिक येणे रक्कम व वसुली नोंदवही) मधील पावत्या व चलने प्रत्यक्ष तपासून पूर्ण करावी.
- गाव नमुना ५ (गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची नोंदवही) अद्ययावत करावी.
- गाव नमुना ९-ब (किर्द रजिस्टर. गा.न. ९ ची पावती पुस्तके व इतर पावती पुस्तके यांची नोंदवही) प्रत्यक्ष तपासावी.
- या तपासणीत विविध प्रयोजनासाठी वापरात असलेल्या जमिनीच्या क्षेत्रात झालेली वाढ/घट, सदर वाढ/घट बाबतची कारणे, त्यांची पडताळणी करणे, सक्षम अधिकार्याने दिलेल्या आदेशांचा योग्य तो अंमल दिला आहे किंवा नाही याची पडताळणी करणे आवश्यक असते.
- प्रत्येक तलाठ्याने दरवर्षी ३१ जुलै रोजी त्याच्या सज्यामधील प्रत्येक गावासाठीचा गाव नमुना ५ तयार करून तो गाव नमुना १ च्या गोषवार्यासह तालुक्यात सादर करावा. तालुका जमाबंदी लिपीकाने गाव नमुना ५ मध्ये नमुद केलेली वाढ किंवा घट, तालुक्यामध्ये उपलब्ध माहितीशी जुळते की नाही हे तपासावे कारण वाढ किंवा घट यांचेशी संबंधीत आदेश तालुका कार्यालयातील जमाबंदी शाखेमार्फतच तलाठ्यांना पाठविले जातात.
- तलाठ्याकडून जमाबंदी शाखेकडील एखाद्या आदेशाची नोंद घेण्याचे राहिले असल्यास ही बाब जमाबंदी लिपीकाच्या लक्षात यायला हवी. तलाठ्याकडून जमाबंदी शाखेकडील एखाद्या आदेशाची नोंद घेण्याचे राहिले असल्यास, गाव नमुना ५ मध्ये योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी. जमाबंदी किंवा ठराव बंद पत्रक तयार झाल्यानंतर तहसिलदारने स्वाक्षरी करून ते तलाठ्यास परत करावे.
- गावाची जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर त्याप्रमाणे गाव व तालुका नमुने अद्ययावत केले जातात. यानंतर मा. जमाबंदी संचालक (जिल्हाधिकारी) व संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी तालुक्यातील ३३% गावांचे १०% व १०% गावांचे १००% लेखा परीक्षण करावयाचे असते. जमाबंदी पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत असे लेखा परीक्षण पूर्ण होणे अपेक्षित असते.