Contact us on Telegram Chat Now! YouTube Channel Link!

गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा 7-12 माहिती

गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा

 

सात-बारा या नावाबाबत एक दंतकथा प्रसिध्‍द आहे. या दंतकथेनुसार अहिल्‍याबाई होळकर यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसांच्‍या दारात बारा फळझाडे लावली होती, त्‍यातील सात झाडे त्या गरीब माणसांची आणि पाच झाडे सरकारची. त्‍या गरीब माणसांवर या बारा झाडांची निगा राखण्‍याची जबाबदारी होती. या बारा झाडाला येणार्‍या फळांपैकी सात झाडांची फळे त्‍या गरीबाने घ्‍यायची आणि उर्वरीत पाच झाडांची फळे इतर गरीबांना वाटण्‍यासाठी सरकारला द्‍यायची असे ठरवले गेले. या झाडांच्‍या नोंदीसाठी एक विशेष सरकारी दप्‍तर निर्माण करण्‍यात आले. या झाडांच्‍या नोंदीच्‍या उतार्‍याला "सात बाराचा उतारा" असे म्‍हणण्‍याचा प्रघात पडला तो आजपर्यंत चालु आहे.

यातील खरे-खोटे माहीत नाही परंतू सात-बारा हा अनेकांच्‍या जिव्‍हाळ्‍याचा विषय आहे हे निश्‍चित.

सात-बाराबाबत सखोल माहिती खालील प्रमाणे.

 

तलाठी दप्‍तरामध्‍ये एक ते एकवीस असे एकवीस प्रकारचे प्रमुख गाव नमुने विहीत केलेले असतात ज्‍यात अनेक प्रकारच्‍या नोंदी आणि माहिती समाविष्‍ठ असते. या एकवीस प्रकारच्‍या गाव नमुन्‍यातील, गाव नमुना क्रमांक सात आणि गाव नमुना क्रमांक बारा यांमध्‍ये गावातील प्रत्‍येक शेत जमीनीची, त्‍या शेत जमीनीत येणार्‍या पिकांची आणि इतर संलग्‍न माहिती नमूद असते. या दोन्‍ही नमुन्‍यांतील माहिती एकमेकांना पूरक असल्‍यामुळे हे दोन्‍ही नमुने एकत्र, एकाच पानावर ठेवले गेले आहेत. त्‍यामुळे यांना सात-बारा म्‍हणण्‍याचा प्रघात आहे. सात-बारा हा जमीनीशी संबंधीत आहे. (जमीनीची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(१६) मध्‍ये नमूद आहे.)

 

गाव नमुना क्रमांक सात : या गाव नमुन्‍याला महसुली भाषेत 'अधिकार अभिलेख पत्रक' असेही म्‍हणतात. 'महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे व सुस्‍थितीत ठेवणे नियम १९७१' यातील नियम ३, , ६ आणि ७ मध्‍ये पहिल्‍यांदा सात-बारा कसा तयार करावा याचे मार्गदर्शन केले गेले आहे.

 

§ गाव नमुना सात-बारा मधील वरचा भाग हा गाव नमुना सात असतो, जो गाव नमुना सहा (फेरफारांची नोदवही) ची सूची असतो. यात मुख्‍यत्‍वे तीन स्‍तंभ (रकाने) असतात.

(१) डावीकडील स्‍तंभ, (२) मध्‍य स्‍तंभ आणि (३) उजवीकडील स्‍तंभ.

सात-बाराच्‍या वरच्‍या भागात प्रथम गावाचे (मौजे) नाव, तालुक्‍याचे नाव आणि जिल्‍ह्‍याचे नाव नमुद असते.

 

(१) गाव नमुना सातचे डावीकडील स्‍तंभ:

§ गाव नमुना सातच्‍या (गावाच्‍या, तालुक्‍याच्‍या, जिल्‍ह्‍याच्‍या नावाखाली), डावीकडील स्‍तंभात (रकान्‍यात) शेत जमीनीचा भुमापन क्रमांक, (भुमापन क्रमांकची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३७) मध्‍ये नमूद आहे.) उपविभाग/पोट हिस्‍सा क्रमांक नमुद असतो. (उपविभाग/पोट हिस्‍सा क्रमांकाची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३५) मध्‍ये नमूद आहे.) पोट हिस्‍स्‍यांची नोंद गाव नमुना सहा-ड मध्‍येही केली जाते.

§ याच्‍या खालील ओळीत त्‍या शेत जमीनीची धारणा पध्‍दती (भोगवटादार वर्ग १ किंवा वर्ग २ किंवा शासकीय पट्‍टेदार) नमुद केली जाते.

भोगवटादार-१ म्‍हणजे ज्‍या शेतजमीनीचा मालक शेतकरी स्‍वत: असतो. अशा जमीनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर कोणतेही बंधन नसते किंवा कोणाच्‍याही परवानगीची आवश्‍यकता नसते. अशा शेतजमीनीला बिनदुमाला किंवा खालसा जमीनही म्‍हणतात. (भोगवटादार वर्ग १ ची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(२) मध्‍ये नमूद आहे.)

 

भोगवटादार-२ म्‍हणजे ज्‍या शेतजमीनीचा मालक शेतकरी स्‍वत: नसतो. अशी जमीनीचे हस्‍तांतरण करण्‍याच्‍या हक्‍कावर शासनाचे निर्बंध असतात. अशा जमीनीची विक्री करण्‍यासाठी त्‍या शेतकर्‍यावर काही बंधने/अटी असतात आणि त्‍यासाठी सक्षम अधिकार्‍याच्‍या परवानगी आणि काही शासकीय सोपस्‍कार पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता असते. अशा शेत जमीनीला दुमाला किंवा नियंत्रीत सत्ता प्रकारची, शर्तीची जमीन असेही म्‍हणतात. (भोगवटादार वर्ग २ ची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २९(३) मध्‍ये नमूद आहे.) भोगवटादार २ ची नोंद गाव नमुना क्रमांक एक-क मध्‍येही केली जाते.

 

शासकीय पट्‍टेदार म्‍हणजे ज्‍यांना ठराविक मुदतीसाठी शासनाकडून वहिवाटण्‍यासाठी भाडेतत्‍वावर जमीन देण्‍यात आली आहे अशी व्‍यक्‍ती. (शासकीय पट्‍टेदारची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(११) मध्‍ये नमूद आहे.)

 

§ गाव नमुना सातवर शेत जमीनीची धारणा पध्‍दतीच्‍या खालील ओळीत त्‍या शेत जमीनीला ज्‍या स्‍थानिक नावाने ओळखले जाते असे स्‍थानिक नाव लिहीले जाते.

 

§ स्‍थानिक नावाखालील ओळीत लागवडीयोग्‍य क्षेत्र लिहीले जाते. या लागवडीयोग्‍य क्षेत्राचे

(१) जिरायत क्षेत्र आणि (२) बागायत क्षेत्र असे प्रकार लिहीले जातात. जिरायत क्षेत्र आणि बागायत क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली या दोघांचे एकुण क्षेत्र लिहीले जाते.

जिरायत क्षेत्र म्‍हणजे पावसाच्‍या पाण्‍यावर अवलंबून असलेले क्षेत्र आणि बागायत क्षेत्र म्‍हणजे इतर सिंचन साधनांपासून (कालवा, कुप नलिका ई.) पाणी मिळणारे क्षेत्र.

प्रचलीत पध्‍द्तीनुसार शेतीचे क्षेत्र हेक्‍टर-आर मध्‍ये लिहीले जाते.

ñएक आर म्‍हणजे १०७६ चौरस फुट किंवा शंभर चौरस मीटर

ñएक एकर म्‍हणजे चाळीस आर किंवा चार हजार चौरस मीटर किंवा ४३०५६ चौरस फूट किंवा शुन्‍य हेक्‍टर ४१ आर.  

ñएक हेक्‍टर म्‍हणजे शंभर आर किंवा २.४७ एकर किंवा दहा हजार चौरस मीटर.

 

§ जिरायत आणि बागायत क्षेत्राच्‍या बेरजेखाली 'पोटखराब' क्षेत्र लिहीले जाते. 'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे ज्‍या क्षेत्रात लागवड करता येणे शक्‍य नाही असे लागवडीयोग्‍य नसलेले क्षेत्र.

या 'पोटखराब' क्षेत्राचे 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' असे दोन भाग पडतात.

ñ 'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र.

'पोटखराब-वर्ग अ' अंतर्गत येणार्‍या क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्‍यात आलेली नसते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणारी जमीन शेतकर्‍यास कोणत्याही लागवडीखाली आणता येऊ शकते.  तथापि, अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीची आकारणी करता येते. 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या जमीनीत जर काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.

ñ 'पोटखराब वर्ग ब' सार्वजनिक प्रयोजनार्थ म्‍हणजे रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही.

'पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' याची क्षेत्र पडताळणी जिल्‍हा भूमापन कार्यालयातील माहितीशी तसेच उपलब्‍ध अभिलेखातील लागवडीयोग्‍य नसलेल्‍या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी.

पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' चे क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

§ एकुण पोटखराब क्षेत्राखाली त्‍या शेतजमीनीसाठी आकारण्‍यात येणार्‍या महसूलाची रक्‍कम लिहीली जाते. ही रक्‍कम 'रुपये-पैसे' या स्‍वरूपात लिहिली जाते व त्‍याप्रमाणे खातेदाराकडून जमीन महसूल स्‍वरुपात, तलाठी यांच्‍यामार्फत वसूल केली जाते. (जमीन महसूलची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(१९) मध्‍ये नमूद आहे.)

 

कायदेशीर तरतूदी :

सर्व जमीनी करासाठी पात्र आहेत (म.ज.म.अ. कलम ६४).

जमीनींचा कर त्‍याच्‍या वापरानुसार निश्‍चित होतो. (म.ज.म.अ. कलम ६७).

करातून अंशत: सूट असलेल्‍या जमिनींचे कर निर्धारण जिल्‍हाधिकारी करतात. (म.ज.म.अ. कलम ६८).

जमीन महसूल हा जमिनीवरील सर्वश्रेष्‍ठ भार असतो. (म.ज.म.अ. कलम ७२).

जमीन महसूल प्राधान्‍याने देणे आवश्‍यक आहे. (म.ज.म.अ. कलम १६८).

महसूल अधिकारी/कर्मचारी यांनी जमीन महसूल वसूल केल्‍यानंतर त्‍याची पावती देणे बंधनकारक आहे. (म.ज.म.अ. कलम ७६).

ज्‍या गावाची पैसेवारी पन्‍नास पैश्‍यापेक्षा कमी असते तेथील जिरायत शेत जमिनींवरील शेतसारा माफ असतो परंतू स्‍थानिक उपकर अदा करावे लागतात.

महसूल व वन विभाग, अधिसूचना क्र. आर.ई.व्‍ही. १०७७-१६४४७-ल-२ दिनांक- २९/१२/१९७७ आणि आर. ई.व्‍ही. १०७८-३३३३८-ल-२ दिनांक- ०८/०५/१९७९ अन्‍वये खालील खातेदारांना जमीन महसुलात  सूट देण्‍यात आली आहे.

P ज्‍या खातेदारांचे संपूर्ण राज्‍यातील एकूण जिरायत (कोरडवाहू) जमीन धारण क्षेत्र ३ हेक्‍टर पेक्षा जास्‍त नाही आणि त्‍यांच्‍या कोणत्‍याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्‍याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही. अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसूलीतून सूट आहे परंतु जि.प. तसेच ग्रा. प. हे स्‍थानिक उपकर माफ नाहीत.

P ज्‍या खातेदारांच्‍या संपूर्ण राज्‍यातील एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये ५/- पर्यंत आहे अशा खातेदारांना जमीन महसूल तसेच जि.प. आणि ग्रा. प. या स्‍थानिक उपकरांच्‍या वसूलीतून सूट आहे.

P ज्‍या खातेदारांच्‍या संपूर्ण राज्‍यातील एकुण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये ५/- ते रुपये १०/- दरम्‍यान आहे तसेच त्‍यांच्‍या कोणत्‍याही जमीनीचा, कोणताही भाग, कोणत्‍याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसूलीतून सूट आहे परंतु जि.प. तसेच ग्रा. प. हे स्‍थानिक उपकर माफ नाहीत.

 

§ शेतजमीनीसाठी आकारण्‍यात येणार्‍या महसुलाच्‍या रक्‍कमेखाली 'जुडी किंवा विशेष' या प्रकारच्‍या रकमेचा उल्‍लेख असतो. 'जुडी' म्‍हणजे इनामदाराकडून देण्‍याजोगे कोणतेही मूल्‍य जे सरकार जमा केले जाते.

 

§ या खाली खातेदाराकडून वसूल करण्‍याची एकूण रक्‍कम नमुद केली जाते.

 

(२) गाव नमुना सातचा मध्‍य स्‍तंभ:

§ गाव नमुना सातच्‍या मध्‍य स्‍तंभात भोगवटादाराचे नाव लिहिलेले असते. भोगवटादार म्‍हणजे जमिनीचे मालक, कायदेशीररित्‍या जमीन कब्‍ज्‍यात असणार्‍या व्‍यक्‍ती. (भोगवटाची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(२४) आणि भोगवटादारची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(२३) मध्‍ये नमूद आहे.) त्‍या भोगवटादाराकडे सदर जमीन कशी व कोणत्‍या हक्‍काने आली त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक त्‍याच्‍या नावाखाली वर्तूळात लिहिलेला असतो.

 

(३) गाव नमुना सातचे उजवीकडील स्‍तंभ:

§ गाव नमुना सातच्‍या उजवीकडील स्‍तंभात वरील बाजुस खाते क्रमांक नमुद असतो. हा खाते क्रमांक गाव नमुना आठ-अ (खातेदारांची नोंदवही) मधील खातेक्रमांक असतो. 

§ खाते क्रमांकाखाली गाव नमुना सात-अ (कुळ हक्‍काबाबतची नोंदवही) ची थोडक्‍यात माहिती असते, यात 'कुळाचे नाव', 'इतर हक्‍क' याची माहिती असते. त्‍या शेतजमीनीत काही कुळ हक्‍क असतील तर त्‍या कुळाची नावे व त्‍याखाली सदर कुळाचा त्‍या जमीनीत कसा व काय हक्‍क आहे त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक कुळांच्‍या नावाखाली वर्तूळात लिहीलेला असतो.

§ याशिवाय कुळाच्‍या नावाखाली 'इतर हक्‍क' खाली त्‍या जमिनीत इतर व्‍यक्‍ती किंवा संस्‍था यांचे काही हक्‍क असल्‍यास, जसे कर्ज, बँक बोजा, आरक्षण इत्‍यादींशी संबंधीत नावे आणि त्‍याबाबतचा फेरफाराचा क्रमांक, नावाखाली वर्तूळात लिहिलेला असतो. शेत जमीनीत असलेल्‍या विहीर, बोअरवेल यांचा उल्‍लेखही 'इतर हक्‍क' सदरी केला जातो. या स्‍तंभाच्‍या शेवटी सीमा आणि भूमापन चिन्‍हे याची माहिती नमूद असते. यालाच हद्‍दीची निशाणी म्‍हणतात. (हद्‍दीची निशाणीची व्‍याख्‍या 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, कलम २(३) मध्‍ये नमूद आहे.)   

 

इथे गाव नमुना सात-बारा मधील, गाव नमुना सातबाबतचा तपशील संपतो आणि त्‍या खाली किंवा मागील बाजुस गाव नमुना बाराची माहिती सुरू होते.

 

गाव नमुना बारा : महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९ अन्‍वये असलेला गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही) हा तक्‍ता स्‍वरुपात असतो. हा नमुना पिक पहाणी आणि पैसेवारीसाठी अत्‍यंत महत्‍वाचा असतो. याची नोंद गाव नमुना अकरा मध्‍येही असते.  या गाव नमुना बारामध्‍ये त्‍या शेत जमीनीतील पिकांची आणि जलसिंचनाच्‍या साधनांची सविस्‍तर माहिती असते.

दिनांक ०१/०१/१९७६ पासून 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्‍तिका-खंड ४' मध्‍ये विहीत करण्‍यात आलेला गाव नमुना बारा, अंमलात आला. यामध्‍ये पंधरा स्‍तंभ आहेत, पंधरावा स्‍तंभ 'शेरा' हा आहे. १० मे १९७६ रोजीच्‍या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्‍ये एक स्‍तंभ वाढवण्‍यात यावा आणि स्‍तंभ पंधरामध्‍ये 'प्रत्‍यक्ष लागवड करणार्‍याचे नाव' लिहावे आणि नवीन सोळावा स्‍तंभ शेर्‍यासाठी ठेवावा अशी सुचना देण्‍यात आली होती. मात्र महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्‍या (तयार करणे आणि सुस्‍थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रीत वाचन केल्‍यास, ज्‍या व्‍यक्‍तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्‍याचा अधिकार आहे, फक्‍त अशाच व्‍यक्‍तींची नावे स्‍तंभ पंधरामध्‍ये लिहिणे योग्‍य ठरते. त्‍यामुळे प्रचलीत गाव नमुना बारामध्‍ये पंधरा स्‍तंभच ठेवण्‍यात आले आहेत.    

 

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-१: यात वर्षाचा उल्‍लेख असतो.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-२: यात हंगामाचा उल्‍लेख असतो. यात खरीप हंगामात घेतलेली पीके (०१ ऑगस्‍ट ते १५ ऑक्‍टोबर) आणि रब्‍बी हंगामात घेतलेली पीके (१५ नोव्‍हेंबर ते ३१ जानेवारी) यांचा उल्‍लेख असतो.

§ 'मिश्र पिकाखालील क्षेत्र' या शिर्षकाखाली एकुण सहा (३ ते ८) स्‍तंभ येतात.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-३: येथे मिश्र पिकांना शेतकी विभागाकडून दिलेल्‍या संकेतांकांचा उल्‍लेख असतो.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-४: शेत जमीनीतील मिश्र पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहीले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-५: शेत जमिनीतील मिश्र पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-६: या स्‍तंभात काही घटक पिके असल्‍यास त्‍या घटक पिकाचे नाव लिहिले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-७: या स्‍तंभात घटक पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-८: या स्‍तंभात घटक पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.

'निर्भेळ पिकाखालील क्षेत्र' या शिर्षकाखाली एकूण तीन (९ ते ११) स्‍तंभ येतात.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-९: या स्‍तंभात निर्भेळ पिकाचे नाव लिहिले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-१०: शेत जमीनीतील निर्भेळ पिकाखालील जलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-११: शेत जमीनीतील निर्भेळ पिकाखालील अजलसिंचीत क्षेत्र असल्‍यास ते क्षेत्र किती ते येथे हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते.

'लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेली जमीन' या शिर्षकाखाली एकूण दोन (१२ ते १३) स्‍तंभ येतात.

§ गाव नमुना बारा- स्‍तंभ-१२: यात लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेल्‍या जमिनीच्‍या स्‍वरुपाचे वर्णन लिहितात. म्‍हणजे कोणत्‍या कारणामुळे सदरचे क्षेत्र लागवडीसाठी उपलब्‍ध नाही. उदा. विहीरीमुळे, पड असल्‍यामुळे, घर असल्‍यामुळे इत्‍यादी. गाव नमुना बाराच्‍या स्‍तंभ बारामध्‍ये पडीक जमिनीचा उल्‍लेख करतांना खाली नमूद आठ विविध प्रकाराखालील जमिनींचा स्‍वतंत्रपणे उल्‍लेख करावा. 

 

õ लागवडीस अयोग्‍य, पडीक जमीन : (१) गावातील सरकारी तसेच खाजगी वनांखालील जमिनीचे क्षेत्र, (२) डोंगराळ, खडकाळ भाग, वाळवंट, नद्‍यांखालील क्षेत्र, (३) इमारती, रेल्‍वे, रस्‍ते, दफनभूमी, सैनिकी छावण्‍या, पाणीपुवठा साधने इत्‍यादी.

 

लागवडीस योग्‍य, पडीक जमीन : (४) काही विशिष्‍ठ कालावधीसाठी (५ वर्षे किंवा अधिक काळासाठी) पडीक ठेवलेल्‍या जमिनी, (५) गवताळ आणि गुरे चारण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या जमिनी, (६) वनांव्‍यतिरिक्‍त उपयुक्‍त झाडे असलेल्‍या जमिनी, (७) इतर पडीक (एक ते पाच वर्षे काळासाठी) जमिनी, (८) चालू पडीक (वर्षामध्‍ये फक्‍त एकाच हंगामात (खरीप किंवा रब्‍बी)) पडीक ठेवलेल्‍या जमिनी.

 गाव नमुना बारा- स्‍तंभ-१३: यात लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेल्‍या जमिनीचे क्षेत्र, हेक्‍टर- आर मध्‍ये लिहिले जाते. म्‍हणजेच वरील प्रमाणे विहीर किती क्षेत्रात बांधली आहे, किती क्षेत्र पड आहे,  किती क्षेत्रात घर बांधले आहे इत्‍यादी.

गाव नमुना बारा- स्‍तंभ-१४: यात सदर जमिनीत उपलब्‍ध असलेल्‍या जलसिंचनाच्‍या साधनांचा उल्‍लेख असतो. उदा. विहीर, बोअरवेल, पाट, कालवा इत्‍यादी. जलसिंचनाच्‍या साधनांची नोंद गाव नमुना चौदामध्‍येही असते.

 गाव नमुना बारा- स्‍तंभ-१५: हा स्‍तंभ शेरा लिहिण्‍यासाठी वापरला जातो.

पिक पहाणीच्‍या वेळेस मालक अथवा कुळ यांचे व्‍यतिरिक्‍त अन्‍य व्‍यक्‍ती जमीन कसत असेल तर तलाठी फॉर्म नंबर १४ भरुन तहसिलदारकडे पाठवतात. गाव नमुना सात-ब मध्‍ये त्‍या व्‍यक्‍तीची पेंसिलने नोंद करतात. मात्र पिकांच्‍या नोंदी वस्‍तुस्‍थितीप्रमाणे घेतल्‍या जातात. 

तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्ये नाव असणारी व्‍यक्‍ती जमीन कसत होती' असा निकाल दिला तर गाव नमुना गाव नमुना सात-ब मध्‍ये तहसिलदार यांनी सदर बाबत दिलेल्‍या निकालाचा क्रमांक व दिनांक लिहून तशी नोंद केली जाते. जर तहसिलदार यांनी 'नमुना १४ च्‍या फॉर्ममध्‍ये नाव असणारी व्‍यक्‍ती अनाधिकाराने जमीन कसत आहे' असा निकाल दिला तर गाव गाव नमुना सात-ब मधील पेन्सिलची नोंद खोडून टाकावी.

 

महत्‍वाचे:

गाव नमुना सात-बारा सदरी कोणतीही नोंद किंवा बदल फेरफाराशिवाय होत नाही.

गाव नमुना सात-बारा लिहितांना प्रत्‍येक भुमापन क्रमांक/पोट हिस्‍सा क्रमांक यासाठी स्‍वतंत्र पान वापरले जाते. गाव नमुना सात-बारा पुस्‍तकातील प्रत्‍येक पान तहसीलदारांनी त्‍यांच्‍या सही आणि गोल शिक्‍क्‍यासह प्रमाणित केलेले असावे.  

खरेदी, विक्री, वाटप किंवा अन्‍य कारणामुळे जमिनीचा पोट हिस्‍सा झाला असेल तर त्‍याची नोंद गाव नमुना सात-बारा पुस्‍तकातील स्‍वतंत्र पानावर घ्‍यावी आणि त्‍यासाठी गाव नमुना सात-बारा पुस्‍तकातील शेवटचे कोरे पान वापरावे. दहा वर्षानंतर, गाव नमुना सात-बारा पुनर्लेखनाच्‍यावेळेस असे लिहिलेले शेवटचे पान योग्‍य त्‍या अनुक्रमांकाने लिहावे.    

फॉर्म नंबर १४ बाबत तहसिलदारांच्‍या निकालान्‍वयेही पिक पहाणी फक्‍त एका वर्षासाठीच लावता येते. मागील काही वर्षांची पिक पहाणी लावता येत नाही.

 

गाव नमुना सात-बारा लिहितांना घ्‍यावयाची काळजी :

अ. दर दहा वर्षांनी गाव नमुना सात-बाराचे पुनर्लेखन करण्‍यात येते.

आ. गाव नमुना सात-बाराचे पुस्‍तक १०० ते १५० पानाचे असावे. ते चांगले बांधलेले असावे तसेच त्‍याला जाड पुठ्‍ठ्‍याचे कव्‍हर असावे.

इ. गाव नमुना सात-बाराचे पुस्‍तक लिहितांना कधीही, कुठेही खाडाखोड करु नये.

ई. गाव नमुना सात-बारा पुनर्लेखनाच्‍यावेळेस जुन्‍या गाव नमुना सात-बाराच्‍या पानावरील सर्व फेरफार क्रमांक पुनर्लिखीत गाव नमुना सात-बाराच्‍या पानावर (कंसात) वरील बाजुला लिहिणे आवश्‍यक आहे. याकडे काटेकोरपणे लक्ष द्‍यावे.

उ. रद्‍द झालेली, अधिकार संपलेली (कंस झालेली) नावे पुनर्लेखनाच्‍यावेळेस नवीन गाव नमुना

सात-बाराच्‍या पानावर लिहिण्‍याची आवश्‍यकता नसते. परंतु त्‍यांचे फेरफार क्रमांक न चुकता लिहावेत.

ऊ. पुनर्लेखनानंतर गाव नमुना सात-बारा पुन्‍हा तपासून पहावा. जुनी गाव नमुना सात-बारा पुस्‍तके तहसील कायार्लयातील अभिलेख कक्षात जमा करावी.


About the Author

Hello Friends, My Name is Iqbal Mulani. My Passion is to Share Knowledge With Everyone. Also I am a Youtuber | Blogger | Web Developer and Programmer

Post a Comment

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.