Close

महसूल संबंधित व्‍याख्‍या 1 ते 10

 १. 'कृषी वर्ष' म्‍हणजे १ एप्रिल ते ३१ मार्च हा कालावधी 'कृषी वर्ष' मानला जातो. [म.ज.म.अ. कलम २(१)] 

 

२. 'दुमाला' म्‍हणजे ज्‍या जमिनीचा महसूल वसूल करण्याचा शासनाचा अधिकार, पूर्णतः किंवा अंशत:  दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे मालकीहक्काने हस्तांतरित होतो, अशा जमिनीला दुमाला अर्थात इनाम जमिनी म्हणतात. [म.ज.म.अ. कलम २(२)] 

 

३. 'हद्‍दीची निशाणी' म्‍हणजे जमिनीच्या कोणत्याही भागाची हद्‍द दर्शविण्‍यासाठी उभी केलेली कोणतीही मातीची, दगडाची किंवा इतर पदार्थाची तसेच, कोणतेही कुंपण, बिन-नांगरलेला बांध किंवा जमिनीची पट्टी किंवा कोणतीही नैसर्गिक किंवा कृत्रिम वस्तू. [म.ज.म.अ. कलम २(३)] 

 

४. 'इमारत' म्‍हणजे शेतातील इमारत नसलेले कोणतेही बांधकाम. [म.ज.म.अ. कलम २(४)] 

 

५. 'इमारतीची जागा' म्‍हणजे बांधकाम करण्याच्या प्रयोजनाकरिता धारण केलेला जमिनीचा भाग, मग त्यावर प्रत्यक्षपणे कोणतीही इमारत उभारण्यात आली असो किंवा नसो, आणि तिच्याशी संलगन असेलेली मोकळी जागा किंवा अंगण. [म.ज.म.अ. कलम २(५)] 

 

६. 'प्रमाणित प्रत' किंवा 'प्रमाणित उतारा' म्‍हणजे, भारतीय पुरावा अधिनियम, १८७२ याच्या कलम ७६ अन्वये विहित केलेल्या रीतीने प्रमाणित केलेली, यथास्थिती प्रत किंवा उतारा. [म.ज.म.अ. कलम २(६)] 

 

७. 'चावडी' म्‍हणजे गावाचा कारभार चालविण्यासाठी ग्राम अधिकाऱ्याकडून सर्वसाधारणपणे वापरण्यात येणारी जागा. [म.ज.म.अ. कलम २(७)] 

 

८. 'आधारसामग्री संचयिका' म्‍हणजे संबंधित विभागाच्‍या जिल्‍हा प्रमुखाने निर्णायकतेने प्रमाणित केलेला आणि त्‍याने वेळोवेळी अद्‍ययावत करुन संबंधित जिल्‍हाधिकारी कार्यालयात सुस्‍थितीत ठेवलेल्‍या माहितीचा संचयिका संग्रह. जो जमिनीची अकृषिक वापराची परवानगी देतांना वापरण्‍यात येतो. [म.ज.म.अ. कलम २(७-अ)]       

 

९.'भू-संपत्ती' म्‍हणजे जमिनीतील कोणताही हितसंबंध आणि ती जमीन धारण करण्यास पात्र असलेल्या व्यक्तींकडे किंवा व्यक्तीसमूहांकडे निहित असलेले एकू हितसंबंध. [म.ज.म.अ. कलम २(८)]

 

१०.'शेतातील इमारत' म्‍हणजे शेतीच्या कारणाकरिता धारण केलेल्‍या जमिनीवर, तिच्या मालकामार्फत किंवा लागवड करणार्‍या व्‍यक्‍तीकडून पुढीलपैकी सर्व किंवा कोणत्याही प्रयोजनासाठी,

क) शेतीची अवजारे, खत किंवा वैरण साठविण्यासाठी;

ख) शेतीचे उत्पन्न साठविण्यासाठी;

ग) गुराढोरांना निवारा मिळण्यासाठी;

घ) जमीन धारकाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या, सेवकांच्‍या किंवा कुळांच्या निवासासाठी किंवा ङ) लागवडीसंबंधीच्या, त्याच्या व्यवस्थेचा एक अभिन्न भाग असलेल्या इतर कोणत्याही प्रयोजनासाठी बांधलेले बांधकाम. [म.ज.म.अ. कलम २(९)]


Comments