महसूल संबंधित व्‍याख्‍या 101 ते 110

 



१०१. 'भू-धारणपद्धती' म्हणजे धारण केलेली जमीन दुमाला जमीन किंवा बिनदुमाला जमीन आहे आणि बिनदुमाला जमिनीच्या बाबतीत खातेदार वर्ग १ किंवा खातेदार वर्ग २ किंवा सरकारी पट्टेदार म्हणून आहे किंवा कसे. [महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ नियम ४(१)(तीन)]

 

१०२. नियोजन प्राधिकरण म्हणजे महाराष्ट्र प्रादेशिक नगरनियोजन अधिनियम, १९६६ मध्‍ये व्याख्या केल्याप्रमाणे असलेले नियोजन प्राधिकरण. [महाराष्ट्र जमीन महसूल शेतातील इमारत (उभारणे, नूतनीकरण करणे, पुनर्बांधणी करणे, फेरबदल करणे किंवा भर घालणे इत्यादी) नियम, १९८९, नियम २(क)]

 

१०३.चालू जमीन महसूल म्हणजे जमीन महसूल अधिनियम, कलम १७० अन्वये कोणत्याही जमिनीच्या संबंधात देय असलेला जमीन महसूल. [महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सुट देणेनियम, १९७०, नियम २(ब)]

 

१०४. सार्वत्रिक आपत्ती म्हणजे अवर्षण, पूर, पाऊस न पडणे किंवा जास्त पाऊस पडणे किंवा अवेळी पाऊस पडणे किंवा कोणत्याही इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही महसूल वर्षात पिकांची मोठ्या प्रमाणावर किंवा सार्वत्रिक हानी आणि यामध्ये अलीकडच्या कोणत्याही आपत्तीमुळे किंवा सक्षम प्राधिकार्‍याने कोणत्याही विधी अन्वये दिलेल्या आदेशामुळे कोणत्याही भू-भागातील जमिनीत पेरणी न झाल्याने पिकांच्या पूर्ण हानीचा समावेश होतो. [महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सुट देणेनियम, १९७०, नियम २(क)]

 

१०५. स्थानिक आपत्ती म्हणजे कोणत्याही महसूल वर्षात कोणत्याही वस्तीतील पिके किंवा इतर मालमतत्ता यांचे गारपीट किंवा आग यामुळे उद्भवलेले किंवा टोळांमुळे किंवा अज्ञान व्यक्तींनी केलेल्या चोरीमुळे किंवा खोडीमुळे झालेले नुकसान किंवा हानी आणि त्यामध्ये पुरांमुळे किंवा अवर्षण, पूर, पाऊस न पडणे किंवा जास्त पाऊस पडणे किंवा अवेळी पाऊस पडणे किंवा कोणत्याही इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही महसूल वर्षात पिकांची मोठ्या प्रमाणावर किंवा सार्वत्रिक हानी आणि यामध्ये अलीकडच्या कोणत्याही आपत्तीमुळे किंवा सक्षम प्राधिकार्‍याने कोणत्याही विधी अन्वये दिलेल्या आदेशामुळे कोणत्याही भू-भागातील जमिनीत पेरणी न झाल्याने पिकांच्या पूर्ण हानीचा खंड () मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही इतर कारणांमुळे झालेल्या पिकांमुळे हानी यांचा समावेश होतो. [महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सुट देणेनियम, १९७०, नियम २(ड)]

 

१०६. धारक म्हणजे, जमीन ज्या गावामध्ये असेल त्या गावाच्या महसुली लेख्यामध्ये ज्याची स्वतंत्र खातेवही ठेवण्यात आली असेल म.ज.म. अधिनियमाच्या कलम १५१ मध्ये निर्दिष्ट केलेल्या शेतजमिनीचा धारक, आणि असे सहभागधारक यांनी संयुक्तपणे धारण केलेल्या जमिनीच्या प्रत्येक सह-भागधारकाचा समावेश होतो. [महाराष्ट्र जमीन महसूल खातेपुस्तिका (तयार करणे, ती देणे व ठेवणे) नियम, १९७१, नियम २(क)]

 

१०७. खातेपुस्तिकाकिंवापुस्तिका म्हणजे, म.ज.म. अधिनियमाच्या कलम १५१ मध्ये निर्दिष्ट केलेली व (जमीन) धारकाला पुरविलेली किंवा पुरविण्यात येणारी पुस्तिका, यामध्ये, त्याच्या जमिनीसंबंधीच्या अधिकार अभिलेखाची एक प्रत व म.ज.म. अधिनियमाच्या कलम १५१() मध्ये निर्दिष्ट केलेली इतर माहिती अंतर्भूत असते आणि अशी माहिती अंतर्भूत करण्याकरिता पुरविण्यात आलेल्या किंवा पुरविण्यात येणार्‍या पुरवणीचा त्यामध्ये अंर्तभाव होतो. [महाराष्ट्र जमीन महसूल खातेपुस्तिका (तयार करणे, ती देणे व ठेवणे) नियम, १९७१, नियम २(इ)]

 

१०८. तगाई म्हणजे, शासनाने मंजुर केलेले आणि त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही विधीअन्वये, तलाठ्यास वसूल करता येईल असे कोणतेही कर्ज. [महाराष्ट्र जमीन महसूल खातेपुस्तिका (तयार करणे, ती देणे व ठेवणे) नियम, १९७१, नियम २(ग)]

 

१०९. 'व्यापक स्वरुपाचा व लाभप्रद कुंभार किंवा विट व्यवसाय' म्हणजे, कोणताही कुंभार किंवा विटा अथवा लाद्या तयार करणारी व्यक्ती करीत असलेल्‍या व्यवसायामध्ये तयार करण्यात आलेल्या मालाचे वार्षिक मूल्य वीस हजारांपेक्षा कमी नसेल तर, तो व्यवसाय व्यापक स्वरुपाचा व लाभप्रद असल्याचे समजण्यात येईल. [महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८, नियम ४]

 

११०. मीठ आयुक्त म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क आणि अधिनियम, १९४४ अन्वये तयार करण्यात आलेले केंद्रीय उत्पादन शुल्क नियम १९४४ अन्वये मीठाच्या संबंधित जिल्हाधिकार्‍यांच्या शक्तींचा वापर करण्यासाठी ज्यांना शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत असे अधिकारी. [महाराष्ट्र जमीन महसूल (गौण खनिजांचे उत्खनन व ती काढणे) नियम, १९६८, नियम ५]  

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment