प्रश्न :-
छापील गाव नमुना बारा आणि संगणीकृत गाव नमुना बारा याच्यात नमुद स्तंभांच्या (Columns) संख्येत फरक असण्याचे कारण काय?उत्तर :-
दिनांक ०१/०१/१९७६ पासून 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका-खंड ४' मध्ये विहीत करण्यात आलेले गाव नमुने अंमलात आले आहेत. खंड ४ अन्वये, गाव नमुना बारामध्ये पंधरा स्तंभ असावे असे निर्देश दिलेले होते. यातील पंधरावा स्तंभ 'शेरा' हा होता. याप्रमाणे पंधरा स्तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्ध होते. काही ठिकाणी 'रीत' हा स्तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्ध होते.
दिनांक १० मे १९७६ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार, गाव नमुना बारामध्ये एक स्तंभ वाढवण्यात यावा आणि स्तंभ पंधरामध्ये 'प्रत्यक्ष लागवड करणार्याचे नाव' लिहावे आणि नवीन सोळावा स्तंभ शेर्यासाठी ठेवावा असा आदेश पारित झाला होता.
या आदेशान्वये सोळा स्तंभ असलेले गाव नमुना बारा उपलब्ध करून घेण्यात आले. तथापि, महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे आणि सुस्थितीतीत ठेवणे) नियम १९७१ मधील नियम २९, ३० व ३१ यांचे एकत्रित वाचन केल्यास, फक्त ज्या व्यक्तींना अधिकार अभिलेखातील नोंदींप्रमाणे जमीन कसण्याचा वैध अधिकार आहे अशाच व्यक्तींची नावे स्तंभ पंधरामध्ये लिहीणे योग्य ठरते. त्यामुळे काही ठिकाणी पुन्हा खंड ४ नूसार गाव नमुना बारा वापरण्यात सुरूवात झाली.
संगणीकृत गाव नमुना बारा तयार करतांना, शासनाचे पत्र क्र. सी.एल.आर-२००१/प्र.क्र.४/भाग-१, दिनांक १३/११/२००२ खंड ४ अन्वये 'वहिवाटदारांची नावे' आणि 'रीत' हे स्तंभ काढून टाकण्याचे निर्देश दिले. संगणीकृत गाव नमुना बारा तयार करतांना, खंड ४ नूसार, स्तंभ क्रमांक ३ नुसार स्वतंत्र उभ्या स्तंभामध्ये दर्शविण्यात आलेला "मिश्र पिकाचा संकेतांक" हा स्तंभ, संगणीकृत गाव नमुना बारा मध्ये आडव्या ओळीत घेतल्याने एक स्तंभ काॕलम कमी होऊन १४ स्तंभ झाले आहेत. मिश्र पिकाच्या या आडव्या स्तंभामुळे भविष्यात एकाच जमिनीत भिन्न मिश्र पिकांच्या नोंदी घेताना मोठी अडचण येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in