पोटखराब क्षेत्र म्‍हणजे काय आणि त्‍याचे किती प्रकार आहेत ?

प्रश्‍न :-

'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे काय आणि त्‍याचे किती प्रकार आहेत?

उत्तर :-

'पोटखराब' क्षेत्र म्‍हणजे खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र ज्‍यात पिक लागवड करता येणे शक्‍य होत नाही असे लागवडीयोग्‍य नसलेले क्षेत्र.

या 'पोटखराब' क्षेत्राचे ''पोटखराब' वर्ग अ' आणि ''पोटखराब' वर्ग ब' असे दोन प्रकार आहेत.

* 'पोटखराब-वर्ग अ' म्‍हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्‍यादीने व्‍याप्‍त असलेले क्षेत्र.

वर्ग अ अंतर्गत येणार्‍या पोटखराब क्षेत्रावर महसूलाची आकारणी करण्‍यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकर्‍याने कोणत्याही लागवडीखाली आणली तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही.

'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्‍हा त्‍याबाबतचा प्रस्‍ताव तहसिलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच 'पोटखराब-वर्ग अ' प्रकाराखाली येणार्‍या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, 'पोटखराब-वर्ग अ' क्षेत्राखाली येणार्‍या जमिनीत जर शेतकर्‍याने काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्‍या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.

* 'पोटखराब वर्ग ब' म्‍हणजे रस्‍ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमाती मार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी किंवा पाण्‍याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्‍ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली, आणि त्‍यामुळे लागवडीसाठी उपलब्‍ध नसलेले क्षेत्र. 'पोटखराब वर्ग ब' क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्‍यात येत नाही.

'पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' याची क्षेत्र पडताळणी जिल्‍हा भूमापन कार्यालयातील माहीतीशी तसेच उपलब्‍ध अभिलेखातील लागवडीयोग्‍य नसलेल्‍या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी.

पोटखराब 'वर्ग अ' आणि 'वर्ग ब' चे क्षेत्र स्‍वतंत्रपणे लिहून त्‍याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق