महसूल संबंधित व्‍याख्‍या 51 ते 60


 


५१. 'अप्‍पर तहसिलदार' चा समावेश सन १९८२ च्‍या महाराष्‍ट्र अधिनियम क्रमांक ५ अन्‍वये तहसिलदार या संज्ञेमध्‍ये केला आहे.

 

५२. 'अतिरिक्‍त तहसिलदार' चा समावेश तहसिलदार या संज्ञेमध्‍ये होतो. (अप्रुकाबाई कानवटे वि. महादू न. बैनवाड, १९९२, एम.सी.आर.१३८) 

 

५३. 'पूर्ण भरतीची खूण' म्‍हणजे वर्षाच्‍या कोणत्‍याही हंगामात, नेहमीच्‍या उधाणाच्‍या भरतीचे पाणी ज्‍या बिंदूपर्यंत चढते तो उच्‍चतम बिंदू समजावा (म.ज.म.अ. कलम २०)

 

५४. 'भोगवटादार- वर्ग एक' म्‍हणजे, ज्या व्यक्ती, बिनदुमला जमीन कायमची हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील कोणत्याही निर्बंधावाचून धारण करीत असतील, अशा व्यक्ती. किंवा  

अ) ज्या व्यक्ती, म.ज.म.अधिनियम अंमलात येण्याच्या वेळी किंवा अंमलात येण्याच्या निकटपूर्वी, राज्याच्या कोणत्‍याही भागात, जमीन महसुलाच्या संबंधात अंमलात असलेल्या कोणत्याही निर्बंधावाचून, संपूर्ण भोगवट्‍याच्‍या अधिकारांन्‍वये किंवा भूमीस्‍वामी हक्‍कान्‍वये जमीन धारण करीत असतील अशा व्यक्ती.

आणि

ब) विदर्भातील जे स्थानिक क्षेत्र, मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता, १९५४ च्‍या कलम १५० अन्वये वगळण्‍यात आले नसेल अशा कोणत्‍याही स्‍थानिक क्षेत्रात ज्‍या व्‍यक्‍ती भूमीधारी हक्‍कान्‍वये जमीन धारण करीत असतीलणि ज्यांना राज्य शासनाने या बाबतीत केलेल्या नियमांस अधीन राहून, यापुढे अशा जमिनीच्या संबंधात द्यावयाच्या आकारणीच्या तिपटीहून अधिक नसेल असे पट्टामूल्य दिल्यानंतर, भोगवटादार - वर्ग एकमध्ये समाविष्ट करून घेण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशा व्‍यक्‍ती. [म.ज.म.अ. कलम २९(२)]

 

५५. 'भोगवटादार - वर्ग दोन' म्‍हणजे ज्या व्यक्ती हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधांना अधीन राहून, बिनदुमाला जमीन कायमची धारणा करीत असतील अशा व्यक्ती. किंवा म.ज.म.अधिनियम अंमलात येण्याच्या निकटपूर्वी,

एक) ज्या व्यक्ती विदर्भात, मध्यप्रदेश जमीन महसूल संहिता, १९५४ अन्वये हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वये, किंवा भूमीधारी हक्कान्वये जमीन धारण करीत असतील अशा व्यक्ती. आणि

दोन) ज्या व्यक्ती, जमीन महसुलाच्या संबंधीच्‍या कोणत्याही इतर कायद्यान्वये, हस्‍तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधासह भोगवट्याच्या हक्कान्वये इतरत्र जमीन धारण करीत असतील अशा व्यक्ती.

तीन) जमीन महसुलासंबंधीच्या या संहितेच्या प्रारंभापूर्वी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली,

ज्या पट्ट्याखाली कायम स्वरूपात किंवा ठराविक खंड देऊन नवीकरण करण्याच्या विकल्पासह कमीतकमी पन्नास वर्षांच्या मुदतीसाठी जमीन धारण करण्याचा हक्क प्राप्त झाला असेल, अशा पट्ट्यान्वये ज्यांना म.ज.म.अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी बिनदुमाला जमिनीतील हक्क देण्यात आले असतील अशा व्यक्ती.

भोगवटादार वर्ग दोन यांचे हक्क, दायित्वे  जबाबदाऱ्या या म.ज.म.अधिनियमातील सर्व तरतुदी जणू ते या अधिनियमान्वये भोगवटादार वर्ग दोन आहेत असे समजून त्यांना लागू होतात. [म.ज.म.अ. कलम २९(३)]

 

५६. 'अनुसूचित जामाती' म्‍हणजे भारतीय संविधानाच्‍या अनुच्‍छेद ४३२ अन्‍वये महाराष्‍ट्र राज्‍यसंबंधात अनुसूचित जमाती म्‍हणून समजण्‍यात येणार्‍या जमाती, वन्‍य जमाती, म.ज.म.अ. कलम ३६-अ अन्‍वये संरक्षणाची गरज असणार्‍या व्‍यक्‍ती.

 

५७. 'म.ज.म.अ. कलम ३६ च्‍या बंधनास पात्र जमिनी' म्‍हणजे जमातीतील व्‍यक्‍तींकडून जमातेतर व्यक्तींना करण्‍यात येणार्‍या हस्‍तांतरणावर निर्बंध असणार्‍या जमिनी.

 

५८. 'नझूल जमीन' म्‍हणजे दिर्घ मुदत किंवा अल्‍प मुदत भाडेपट्‍टावर किंवा ना भरपाई करारावर दिलेल्‍या जमिनींसह इमारत, रस्‍ता, बाजार, क्रिडांगण यांसारख्‍या अकृषिक प्रयोजनांसाठी किंवा इतर कोणत्‍याही सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरण्‍यात येत असेल किंवा ज्‍या जमिनीचा भविष्‍यात असा वापर होण्‍याची शक्‍यता असेल अशी शासकीय जमीन. [म.ज.म.अ. कलम ३७(ब)]

 

५९. खराखुरा औद्‍योगिक वापर' म्‍हणजे कोणत्‍याही व्‍यक्‍तीकडून केली जाणारी मालाची निर्मिती, त्‍याचे जतन किंवा त्‍यावरील प्रक्रिया यासंबंधिचे कार्य किंवा कोणताही हस्तव्यवसाय किंवा औद्‍योगिक व्यवसाय किंवा उपक्रम किंवा  पर्यटनस्थळ किंवा गिरीस्थान म्हणून राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील पर्यटनाचा उपक्रम असा असून त्यात निर्मिती प्रक्रिया किंवा प्रयोजन किंवा वीज प्रकल्प यांसाठी आणि संबंधित उद्‍योगाचे संशोधन विकास, गोदाम, उपहारगृह, कार्यालय इमारत यांसारख्या सहाय्यभूत औद्योगिक वापरासाठी असलेल्या, किंवा संबंधित उद्योगातील कामगारांसाठी राहण्याच्या जागेची तरतूद करण्यासाठी असलेल्या, औद्योगिक इमारतींच्या बांधकामाचा किंवा सहकारी औद्योगिक वसाहत, संधारण उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग युनिट किंवा ग्रामोद्योग वसाहती यांच्यासह औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेचा समावेश होईल. [म.ज.म.अ. कलम ४४(अ)]

 

६०. 'एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्प' म्‍हणजे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम, १९६६च्या तरतुदींखाली शासनाने एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्‍पासाठी तयार केलेल्या विनियमांखालील एक किंवा अनेक एकात्‍मीकृत नगर वसाहत प्रकल्प. [म.ज.म.अ. कलम ४४(अ)]


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق