महसूल संबंधित व्‍याख्‍या 191 ते 200

 



१९१. 'शेतमजूर' म्‍हणजे अशी व्‍यक्‍ती जी कोणत्‍याही प्रकारची स्‍वत:ची शेत जमीन धारण करत नाही आणि कसत नाही परंतु राहते घर धारण करते आणि तिचे एकूण ५०% उत्‍पन्‍न शेत मजुरीपासून मिळते. [महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१-अ)]

 

१९२. 'कुळ' म्हणजे पट्‍ट्‍याने जमीन धारण करणारी व्‍यक्‍ती, जिला, महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ४ अन्‍वये कुळ, किंवा कलम ४-अ अन्‍वये संरक्षीत कुळ किंवा कलम २ (१०-अ) अन्‍वये कायम कुळ मानले गेले आहे. (महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम १८)

 

१९३. 'कायदेशीर कुळ' म्हणजे:

१. जो इसम दुसर्‍याच्या मालकीची जमीन वैध किंवा कायदेशीररित्या कुळ या नात्‍याने कसत असेल आणि

. जमीन मालक आणि अशा कुळात करार झाला असेल, तथापि, जर असा करार तोंडी असेल तर तो न्यायालयात सिध्द होण्‍यास पात्र असेल आणि

. असा कुळ जमीन प्रत्यक्षात स्वत: कसत असेल आणि

. जमीन कसण्याच्या बदल्यात असा कुळ, जमीन मालकास नियमितपणे खंड देत असेल आणि जमीन मालकाने तो खंड स्वीकारत असेल आणि

. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या कुटुंबातील नसेल आणि

. अशा व्यक्तीकडे ती जमीन गहाण नसेल आणि  

. अशी व्यक्ती पगारावर ठेवलेला नोकर नसेल आणि

. अशी व्यक्ती जमीन मालकाच्या किंवा जमीन मालकाच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्‍यक्ष  किंवा अप्रत्‍यक्ष देखरेखीखाली जमीन कसत नसेल तर अशी व्‍यक्‍ती कायदेशीर कुळ आहे.[महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८) कलम ४]

 

१९४. 'संरक्षित कुळ म्‍हणजे सन १९३९ च्या कुळ कायद्यानुसार, दिनांक ०१/०१/१९३८ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणारी व्यक्ती किंवा दिनांक ०१/०१/१९४५ पूर्वी सतत ६ वर्षे कुळ म्हणून जमीन कसणारी व्यक्ती आणि दिनांक ०१/११/१९४७ रोजी कुळ म्हणून जमीन कसणार्‍या व्यक्ती. अशा व्‍यक्‍तीची नोंद अधिकार अभिलेखातइतर हक्कसदरीसंरक्षित कुळम्हणून केली गेली आहे. [महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम ४-अ]

 

१९५. 'कायम कुळ म्‍हणजे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम १९५५ अंमलात येण्याच्‍या निकटपूर्वी ज्या व्यक्तींना वहिवाटीमुळे, रुढीमुळे किंवा न्यायालयीन निकालामुळे कायम कुळ ठरविले गेले त्यांची तसेच जे मूळगेणीदार किंवा मिरासदार म्हणून जमीन धारण करीत होते आणि ज्‍यांच्‍या कुळवहिवाटीसा प्रारंभ किंवा अवधी तिच्‍या प्राचिनत्‍वामुळे समाधानकारक रीतीने सिध्‍द करता येत नसेल आणि ज्‍यांच्‍या पूर्वहक्‍काधिकार्‍याचे नाव कोणत्‍याही अधिकार अभिलेखात किंवा सार्वजनिक अभिलेखात उपरोक्‍त सन १९५५ चा अधिनियम अंमलात येण्याच्‍या निकटपूर्वी कायम कुळ म्‍हणून दाखल होते अशा व्‍यक्‍ती. यांची नोंद अधिकार अभिलेखातइतर हक्कसदरी कायम कुळ म्हणून केली गेली आहे. [महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, (पूर्वीचा मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८) कलम २ (१०-अ)]

 

१९६. 'बेदखल कुळ' म्‍हणजे कुळाने-

अ) कोणत्‍याही महसूल वर्षाचा खंड वर्षानुवर्षे आणि जाणूनबुजून त्‍या त्‍या वर्षांच्‍या ३१ मे पूर्वी न भरल्‍यास,

ब) जमिनीची खराबी अथवा कायम स्‍वरुपी नुकसान होईल असे कृत्‍य जाणूनबुजून केल्‍यास,

क) जाणूनबुजून महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्‍या कलम २७ चे उल्‍लंघन करुन जमिनीची पोट विभागणी, पोटपट्‍टा किंवा अभिहस्‍तांतरण केल्‍यास,

ड) व्‍यक्‍तीश: जमीन न कसल्‍यास,

इ) जमिनीचा उपयोग शेती किंवा शेतीसंलग्‍न जोडधंद्‍यासाठी न करता इतर प्रयोजनांसाठी केल्‍यास,

कुळ कसूरवार ठरतो. जमीन मालकाने कुळास तीन महिन्‍यांची लेखी नोटीस देऊन कुळवहिवाट समाप्‍त करू शकतो. अशा कसूरवार कुळास जमिनीतून घालवून दिल्‍यास त्‍याला बेदखल कुळ म्‍हणतात. (महाराष्‍ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम २०११, कलम १४)

 

१९७. 'शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' असणे' म्‍हणजे एखाद्‍या शेत जमिनीची वहिवाट-

अ. जमिनीचा मालक किंवा त्‍याचे कुटुंबीय करीत असतील किंवा

ब. कुळ कायद्‍यानुसार असलेले कुळ करीत असेल किंवा

क. उपरोक्‍त व्‍यक्‍तीशिवाय अशी इतर व्‍यक्‍ती करीत असेल, जी कायदेशीर कागदोपत्री पुराव्‍याद्वारे स्‍वत:च्‍या वहिवाटीचे समर्थन करू शकेल तर अशा शेतजमिनीवर जमीन मालकाचा 'प्रत्‍यक्ष ताबा' आहे असे कायदा मानतो.    

अनाधिकाराने अथवा दंडेलशाहीने जमिनीचा कब्‍जा घेणार्‍या इसमाविरूध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ५९ आणि कलम २४२ अन्‍वये कारवाई करता येते.

 

१९८. 'व्यक्तिश: जमीन कसणे म्‍हणजे जी व्‍यक्‍ती स्वत:साठी

(एक) स्वत:च्या मेहनतीने, अथवा

(दोन) स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या कष्टाने अथवा

(तीन) स्वत:च्या किंवा स्वत:च्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली, मजुरीने कामावर लावलेल्या मजुरांकडून, त्यांना पिकाच्या हिश्श्याच्या स्वरूपात मोबदला न देता रोख रक्कम अथवा वस्तूंच्या रूपात वेतन/मोबदला देऊन जमीन कसून घेते’’ त्‍याला व्यक्तिश: जमीन कसणेअसे म्‍हणतात.

तथापि, विधवा, अज्ञान, शारीरिक किवा मानसिकदृष्‍या  अपंग आणि सशस्‍त्र दलात नोकरी करणारी व्‍यक्‍ती जरी नोकरामार्फत, मजुरामार्फत किंवा कुळामार्फत जमीन कसवून घेत असली तरी अशी व्‍यक्‍ती व्यक्तिश: जमीन कसते असे मानण्‍यात येते. [महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(६)]

 

१९९. 'कु.का. कलम ८४ क अन्वये कारवाई पात्र जमीन' म्‍हणजे शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीने खरेदी केलेली शेतजमीन. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम ६३ अन्‍वये, शेतकरी नसलेल्‍या व्‍यक्‍तीला महाराष्‍ट्र राज्‍यात शेतजमीन खरेदी खरेदी करता येत नाही. असे हस्‍तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्‍य ठरून अशी जमीन कलम ८४ क अन्वये सरकार जमा करता येते. आणि कलम ८४ कक अन्‍वये अशा जमिनीची विल्‍हेवाट लावता येते.

 

२००. 'कृषी जमीन' म्‍हणजे फळे, भाजीपाला, पीक यांचे उत्‍पन्‍न घेता येईल अशी जमीन. एखाद्‍या व्‍यक्‍तीने जमिनीत फक्‍त 'गवत' उगवतो असा उल्‍लेख केला असेल तर त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत होत नाही तथापि, अशा व्‍यक्‍तीने गुरांना चरणेसाठी गवत वाढविले असेल आणि अशा जमिनीमध्‍ये गुरांना गवत चरण्‍यासाठी मुक्‍तपणे वावर दिला असेल आणि तो अशी कृती सिध्‍द करू शकत असेल तरच 'गवत' चा समावेश हे पीक या सदरात करता येतो आणि त्‍याचा समावेश 'कृषी' या व्‍याख्‍येत करता येतो. [महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, कलम २(१) ; विश्राम काला वि. पी. एम. शाह, १९६० जी.एल.आर.२३]       


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق