महसूल संबंधित व्‍याख्‍या 131 ते 140

 



१३१.अंतर्मृदा हक्क म्हणजे कोणत्याही जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा आतल्या थरावर सापडलेली किंवा सापडण्याची शक्यता असलेली खाण व खनिजे यांवरील कोणतेही हक्क. [संकीर्ण- महाराष्ट्र विवक्षित भूमि अधिनियमातील विद्यमान खाण व जमीन मालकी हक्क नाहिसे करण्याबाबत अधिनियम, १९८५, नियम ३(फ)]

१३२. एखाद्या प्रकल्पाच्या संबंधातबाधित परिमंडल म्हणजे, त्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या परिमंडलाचे क्षेत्र म्हणून कलम १३ अन्वये घोषित केलेले क्षेत्र [संकीर्ण- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, नियम २(१)]

 

१३३. प्रकल्पबाधित व्यक्ती म्हणजे,

() एखाद्या प्रकल्पाच्या प्रयोजनाकरिता, ज्या भोगवटादाराची प्रकल्पबाधित परिमंडलातील जमीन (गावठाणातील जमीन धरून) संपादित करण्यात आली असेल, अशी भोगवटादार व्यक्ती. जेथे एखाद्या शेत जमिनीची, संबंधित गावाच्या अभिलेखातील नोंद, अविभक्त हिंदू कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा व्यवस्थापक म्हणून कोणत्याही एका भावाच्या नावे केलेली असेल, तेथे, प्रत्येक भावाला (किंवा मृत भावाचा मुलगा किंवा मुलगे यांना संयुक्तपणे) त्या जमिनीत हिस्सा राहील, मग त्याचे नाव अशा गावाच्या अभिलेखात नोंदलेले असो व नसो, आणि त्यास प्रकल्पबाधित व्यक्ती म्हणून मानण्यात येईल.

() जमिनीच्या संपादनाच्या वेळी जिच्याकडे संबंधित कुळवहिवाट कायद्यान्वये बाधित परिमंडलातील जमिनीचा प्रत्यक्ष कब्जा असेल अशी व्यक्ती.

() लाभधारक परिमंडलातील ज्या भोगवटादार व्यक्तींची जमीन, मोठ्या व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांखालील कालवे व त्यांचे किनारे यांचे बांधकाम, विस्तार, सुधारणा किंवा विकास यांसाठी किंवा बाधित परिमंडलातील व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी नवीन गावठाण बसविण्यासाठी संपादित केली असून,

(एक) संपादनानंतर जिची उर्वरित लागवडयोग्य धारण जमीन १ हेक्टरहून कमी झाली आहे किंवा

(दोन) जिची उर्वरित धारण जमीन अशा तुकड्यांमध्ये विभागली गेली आहे, की ते लागवडीच्या दृष्टीने फायदेशीर राहिलेले नाहीत किंवा

(तीन) जिची उर्वरित धारण जमीन लागवडीस अयोग्य ठरली आहे. अशी भोगवटादार व्यक्ती. [संकीर्ण- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, नियम २(२)]

 

१३४. शेतजमीन या संज्ञेत फळबागायत करणे, पिके, गवत किंवा बागायती उत्पन्न काढणे, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, पशुधनपैदास, औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणारे रोपमळे किंवा गुरांची चराई, यासाठी वापरण्यात येणार्‍या किंवा वापरण्याजोग्या जमिनी यांचा समावेश होतो. केवळ लाकूड तोडण्यासाठी वापरलेल्या जमिनींचा त्यात समावेश होत नाही. [संकीर्ण- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, नियम २(४)]

 

१३५. प्रकल्प म्हणजे-

() पाटबंधारे प्रकल्प व त्याचा अर्थ पाटबंधार्‍यांच्या प्रयोजनार्थ, पाणीपुरवठा करण्यासाठी केलेले कोणतेही बांधकाम, बांधकामाचा विस्तार, सुधारणा किंवा विकास.

() वीज प्रकल्प म्हणजे, वीजनिर्मिती किंवा वीजपुरवठा यांसाठी उभारलेले कोणतेही काम अथवा वीजविषयक विकासाला पोषक असे कोणतेही काम, यासंबंधाचे बांधकाम, विस्तार, सुधारणा किंवा विकास.

() लोकोपयोगी प्रकल्प म्हणजे, पाटबंधारे प्रकल्प किंवा वीज प्रकल्प यांच्या व्यतिरिक्त लोकोपयोगासाठी केलेले कोणतेही बांधकाम, विस्तार, सुधारणा किंवा विकास. किंवा

() अशा दोन किंवा अधिक प्रकल्पांचा कोणताही संयुक्त प्रकल्प आणि त्यामध्ये ज्यामुळे, अशा प्रकल्पासाठी वापरण्यात येणार्‍या जमिनीचे धारक किंवा भोगवटादार बाधित होतात आणि ज्यांच्यासंबंधात भूसंपादनअधिनियम, कलम ११ अन्वये अधिसूचना काढण्यात आली आहे, असे एखाद्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीशी अनुषंगिक किंवा त्यास पूरक असणारे कोणतेही बांधकाम, विस्तार, सुधारणा किंवा विकासविषयक कामे यांचा समावेश होतो. [संकीर्ण- महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६, नियम २(१०)]

 

१३६. 'स्‍थानिक चौकशी' म्‍हणजे तलाठ्‍याला वर्दी मिळाल्‍यानंतर, त्‍या वर्दीची खातरजमा करण्‍यासाठी सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्‍य प्रतिष्‍ठित व्‍यक्‍तींकडे करण्‍यात येणारी चौकशी म्‍हणजे स्‍थानिक चौकशी.

१३७. 'नोटीस 'बजावणे' म्‍हणजे संबंधीत व्यक्तीला नोटीस प्राप्त होणे. पहिली नोटीस शक्यतो पोस्टाने पाठवली जाते किंवा कोतवालामार्फत संबंधीत व्‍यक्‍तीवर समक्ष किंवा त्‍या व्‍यक्‍तीच्‍या विधी सल्‍लागारावर बजावून पोहोच घेता येते अथवा पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाने पाठवली जाते. पोहोच-देय नोंदणीकृत पोस्टाची पोहोच परत आल्यास नोटीस बजावली गेली असे गृहित धरले जाते. अंतिम नोटीस ही संबंधीत इसमाच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर, त्‍याच्‍या घरातील सज्ञान व्‍यक्‍तीकडे देऊन व त्‍याची पोहोच घेऊन नोटीस बजावता येते अथवा पंचनाम्याने, घराच्या मुख्‍य दरवाज्याला किंवा जमिनीला डकवून (चिकटवून) बजावली जाते. अशाप्रकारे पंचनाम्याने डकवलेली नोटीस बजावली गेली असे गृहीत धरले जाते. काही प्रकरणात वर्तमानपत्रात प्रसिध्‍द करून नोटीस बजावता येते. [म.ज.म.अ. कलम ३०२]

 

१३८. 'जुडी' म्‍हणजे वतन जमिनींसंबंधात शेतजमिनीसाठी आकारण्‍यात येणार्‍या महसूलाच्‍या रक्‍कमेखाली 'जुडी किंवा विशेष' या प्रकारच्‍या रकमेचा उल्‍लेख असतो. इनामदाराकडून वसूल केलेल्‍या जमीन महसूलापैकी जो भाग सरकार जमा केला जातो त्‍या भागाला 'जुडी' म्‍हणतात.

 

१३९. 'नुकसान' म्‍हणजे वतन जमिनींसंबंधात, इनामदाराने वसूल केलेल्‍या जमीन महसुलापैकी जो भाग इनामदार स्‍वत:कडे ठेवतो त्‍या भागाला 'नुकसान' म्‍हणतात.

 

१४०. 'सारा माफी' म्‍हणजे विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करणे म्‍हणजे सारा माफी. [म.ज.म.अ. कलम ४७, ७८]


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق