महसूल संबंधित व्‍याख्‍या 11 ते 20

 



११. 'गावठाण' किंवा 'गावातील जागा' म्‍हणजे, म.ज.म.अ. १९६६, कलम १२२ अन्वये निश्चित करण्यात आल्याप्रमाणे गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेमध्ये समाविष्ट असलेली जमीन. [म.ज.म.अ. कलम २(१०)]

 

१२. 'शासकीय पट्टेदार' म्‍हणजे म.ज.म.अ. १९६६, कलम ३८, अन्वये तरतुद केल्‍याप्रमाणे शासनाकडून पट्‍ट्‍याने जमीन धारण करणारी व्यक्ती. [म.ज.म.अ. कलम २(११)]

 

१३. 'जमीन धारण करणे' किंवा 'जमीन  धारक  असणे'  किंवा 'जमिनीचा धारक असणे' म्‍हणजे वैधरीत्‍या जमिनीचा कब्‍जा असणे, मग ते प्रत्‍यक्षात असो किंवा नसो. [म.ज.म.अ. कलम २(१२)]

 

१४. 'धारण जमीन' म्‍हणजे धारकाने धारण केलेला जमिनीचा भाग. [म.ज.म.अ. कलम २(१३)]

 

१५. 'धारण जमिनीच्या संबंधात 'सुधारणा' या संज्ञेचा अर्थ ज्‍यामुळे जमिनीच्या किंमतीत महत्त्वपूर्ण वाढ होते जे अशा जमिनीवर करणे योग्य आहे, तसेच ज्या कारणाकरिता जमीन धारण करण्यात आली असेल त्या कारणांशी जे सुसंगत आहे आणि जे काम धारण जमिनीवर केले नसेल, तरीही ते तिच्या प्रत्यक्षपणे फायद्यासाठी केलेले असेल किंवा काम झाल्यावर त्या जमिनीस प्रत्यक्षपणे फायदेशीर करून देण्यास येत असेल असे कोणतेही काम, असा होतो. आणि पूर्ववर्ती तरतुदींना अधीन राहून, त्‍यामध्ये,

क) शेतीच्या प्रयोजनांसाठी पाण्याचा साठा, पुरवठा किंवा वाटप करण्यासाठी तलाव, विहिरी, पाण्याचे पाट, बंधारे इतर बांधकामे बांधणे;

ख) जमिनीवरील जलनिस्सारणासाठी किंवा पुरामुळे किंवा धूप होण्यामुळे किंवा पाण्यामुळे होणाऱ्या इतर नुकसानीपासून जमिनीचे संरक्षण करण्यासाठी बांधकामे करणे;

ग) झाडे लावणे आणि जमीन लागवड योग्य करणे, साफ करणे, जमिनीला कुंपण घालणे, ती सपाट करणे किंवा ताली बांधणे;

घ) धारण जमिनींचा सोयीस्कररीत्या किंवा फायदेशीर उपयोग करण्यासाठी किंवा तिचा

भोगवटा करण्यासाठी अशा धारण जमिनीवर किंवा तिच्या परिसरात गावठाणाव्यतिरिक्त इतरत्र

इमारती बांधणे; आणि

ड) वरीलपैकी कोणतेही बांधकाम पुन्हा नव्याने बांधणे किंवा त्याची पुन्हा बांधणी करणे किंवा त्यामध्ये फेरफार किंवा वाढ करणे. या गोष्टींचा समावेश होतो.

परंतु, त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होत नाही-

(एक) त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांकडून शेतीच्या नित्य व्यवसायात सामान्यत: करण्यात येणारी पुढील कामे म्हणजे, तात्पुरत्या विहिरी आणि पाण्याचे पाट बंधारे बांधणे, जमीन सपाट करणे, कुंपण घालणे किंवा अन्य कामे करणे किंवा अशा प्रकारच्या कामात किरकोळ फेरबदल करणे किंवा दुरुस्ती करणे; किंवा

(दोन) भोगवटादार किंवा कुळ म्हणून कोणत्याही इतर व्यक्तीच्या कब्जात कोठेही असलेल्या कोणत्याही जमिनीची किंमत वस्तुत: कमी करणारे कोणतेही काम;

स्पष्टीकरण: जे काम, अनेक धारण जमिनींना फायदेशीर होते ते अशा धारण जमिनींपैकी प्रत्येक धारण जमिनीच्या बाबतीत केलेली सुधारणा आहे असे समजण्यात येईल. [म.ज.म.अ. कलम २(१४)]

 

१६. 'संयुक्त धारक' किंवा 'संयुक्त भोगवटादार' म्‍हणजे, हिंदू कायद्यानुसार अविभक्त कुटुंबातील सहहिस्सेदार असलेले किंवा नसलेले आणि ज्यांच्या हिश्यांची मोजून-मापून विभागणी करण्यात आली नाही असे, जमीन धारण करणारे धारक किंवा भोगवटादार. [म.ज.म.अ. कलम २(१५)]

 

१७. 'जमीन' या संज्ञेत, जमिनीपासून मिळावयाच्या फायद्याचा आणि भूमीस संलग्न असलेल्या वस्तूंचा किंवा भूमीस संलग्न असलेल्या वस्तूंशी कायम जोडलेल्या कोणत्याही वस्तूंचा आणि तसेच, गावांच्या किंवा निश्चित केलेल्या इतर प्रदेशांच्या महसुलातील किंवा खंडातील हिस्सा किंवा त्यावरील आकार, यांसह असलेल्‍या मोकळ्‍या जमिनीचा समावेश होतो. [म.ज.म.अ. कलम २(१६)]

१८. 'जमीन मालक' म्‍हणजे जमीन पट्ट्याने देण्‍याचा कायदेशीर अधिकार असलेला. [म.ज.म.अ. कलम २(१७)] 

१९. 'भूमि-अभिलेख' म्‍हणजे, राज्यांत अंमलात असलेल्या कोणत्याही कायदा, सुधारणा अथवा योजनेन्‍वये ठेवलेले अभिलेख, नकाशे आराखडे आणि त्‍यांच्‍या प्रती. [म.ज.म.अ. कलम २(१८)]

 

२०. 'जमीन महसूल' म्‍हणजे, कोणत्याही व्यक्तीने धारण केलेल्या किंवा तिच्याकडे निहित असलेल्या जमिनीबद्दल किंवा अशा जमिनीत असलेल्या हितसंबंधाबद्दल, तिच्याकडून राज्य शासनाला किंवा राज्य शासनाच्या वतीने वैधरित्या मागणी करण्यात येणारी रक्‍कम, उपकर किंवा पट्टीची रक्‍कम. [म.ज.म.अ. कलम २(१९)]  


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment