नैसर्गिक आपत्तीमध्‍ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांची भूमिका काय असते?

प्रश्‍न :-

नैसर्गिक आपत्तीमध्‍ये तलाठी आणि मंडल अधिकारी यांची भूमिका काय असते?

उत्तर :-

गाव पातळीवर शासनाचे प्रतिनिधी या नात्‍याने तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यरत असतात. त्‍यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्‍ये त्‍यांनी खालील कृती तात्‍काळ करावी.

  1. तलाठी यांनी त्‍यांच्‍या गाव/सज्यांतील सर्व स्वातंत्र्य सैनिक, महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्ती, मोठे व्‍यापारी, डॉक्‍टर, शाळांतील शिक्षक, सर्व कोतवाल, पोलीस पाटील, सर्प मित्र, पट्टीचे पोहणारे, बोटी, सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी, शासकीय यंत्रणेला मदत करणारे स्वयंसेवक, वाहतूक व्‍यापारी, सार्वजनिक मंडळे, क्‍लब, ट्रस्‍ट, हॉटेल/लॉजिंग, देऊळ, इत्यादींची संपूर्ण माहिती असणारे रजिस्टर आधीच तयार करुन ठेवावे. आपत्कालीन परिस्थितीत यांचा चांगला उपयोग होऊ शकतो.
  2. तात्‍काळ घटनास्‍थळी भेट द्‍यावी आणि शक्‍य तितकी मदत करावी.
  3. शक्‍य असेल तितक्‍या लवकर वरिष्‍ठांना नैसर्गिक आपत्तीच्‍या गांभिर्याची कल्‍पना आणि नुकसानीचा अंदाज द्‍यावा.
  4. घटनास्‍थळाचा पंचनामा करावा आणि संबंधितांचे जाब जबाब घ्‍यावे.
  5. बाधित व्‍यक्‍तींना शासकीय स्‍तरावर मदत मिळण्‍यास वेळ लागण्‍याची संभावना असते. ती लक्षात घेऊन तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी स्‍थानिक स्‍तरावर अत्‍यावश्‍यक मदत उपलब्‍ध करुन देण्‍याचे प्रयत्‍न करावेत.
  6. बाधित व्‍यक्‍तींना सुरक्षित स्‍थानावर हलविण्‍याची व्‍यवस्‍था करावी.
  7. बाधित व्‍यक्‍तींच्‍या जेवणाची व्‍यवस्‍था करावी.
  8. बाधित व्‍यक्‍तींना शासनाकडून प्राप्‍त होणारी आर्थिक व अन्‍य मदत करतांना मानवतावादी दृष्‍टिकोन ठेवावा.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment