महसूल संबंधित व्‍याख्‍या 41 ते 50

 



४१. 'भू-मापन अधिकारी' म्‍हणजे, म.ज.म.अ. कलम अन्वये, किंवा त्यामध्ये तरतूद केलेल्या रीतीने नेमलेला अधिकारी. [म.ज.म.अ. कलम २(३९)]

 

४२. 'कुळ' म्‍हणजे, लेखान्वये किंवा तोंडी  करारान्वये जमीन धारण करणारा पट्टेदार किंवा कब्‍जासहित कुळाचे हक्क गहाण घेणारी व्यक्ती. यामध्ये प्रत्यक्षपणे राज्य शासनाकडून जमीन धारण करणाऱ्या पट्टेदाराचा समावेश होत नाही. [म.ज.म.अ. कलम २(४०)]

 

४३. 'भोगवट्यात नसलेली जमीन' म्‍हणजे, भोगवटादार, कु किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनीखेरीज गावातील जमीन. [म.ज.म.अ. कलम २(४१)]

 

४४. 'नागरी क्षेत्र' म्‍हणजे, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये घटित करण्यात आलेल्या कोणत्याही महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेले क्षेत्र. [म.ज.म.अ. कलम २(४२)]

आणि 'नगरेतर क्षेत्र' या शब्दप्रयोगाचा अर्थ त्यानुसार लावला जाईल. 

 

४५. 'गाव' या संज्ञेत, नगराचा किंवा शहराचा आणि गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या सर्व जमिनींचा समावेश होतो. [म.ज.म.अ. कलम २(४३)]

 

४६. 'वाडा जमीन' म्‍हणजे, गुरे-ढोरे बांधण्यासाठी किंवा पीक किंवा वैरण, खत किंवा तत्सम इतर वस्तू साठविण्यासाठी वापरलेली गावठाणातील खुली जागा असा होतो. [म.ज.म.अ. कलम २(४४)]

 

४७. 'मालिक  मकबुजा', 'रयत मालिक', 'पूर्ण वहिवाटदार कुळ', 'दुमालापूर्व कुळ', 'पुरातन कुळ', 'भूमी स्‍वामी' म्‍हणजे राज्याच्या विदर्भ प्रदेशात अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यातील भगवटादार वर्ग-एक संबंधीचे संदर्भ. [म.ज.म.अ. कलम ३३७]

 

४८. 'वहिवाटदार कुळ', 'रयत', 'भूमिधारी' म्‍हणजे राज्याच्या विदर्भ प्रदेशात अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यातील भगवटादार वर्ग-दोन संबंधीचे संदर्भ. [म.ज.म.अ. कलम ३३७]

 

४९. 'खजान जमीन' किंवा 'खार जमीन' म्‍हणजे जी जमीन लागवडीखाली आणता येते आणि ती समुद्र किनार्‍यालगत असते व ती भरतीमुळे पाण्‍याखाली जाते. (सेक्रेटरी ऑफ स्‍टेट वि.फेअरडून, ए.आय.आर. १९३४, बॉम्‍बे ४३४) 

 

५०. 'स्‍थावर संपत्तीचा भाडेपट्‍टा' म्‍हणजे हस्‍तांतरितीने हस्‍तांतरकाला दिलेली किंवा देण्‍याचे वचन दिलेली किंमत अथवा नियतकालांतरगणिक किंवा विनिर्दिष्‍ट प्रसंगी द्‍यावयाचे पैसे, पिकाचा वाटा, सेवा किंवा अन्‍य कोणतीही मूल्‍यवान वस्‍तू यांच्‍या प्रतिफलार्थ हस्‍तांतरकाने व्‍यक्‍तपणे किंवा उपलाक्षणेने निश्‍चित किंवा शाश्‍वत काळाकरिता केलेले व हस्‍तांतरितीने अशा अटीवर स्‍विकारलेले, संपत्तीचा उपभोग घेण्‍याच्‍या अधिकाराचे हस्‍तांतरण होय. हस्‍तांतरकाला 'पट्‍टाकार'; हस्‍तांतरितीला 'पट्‍टेदार'; किंमतीला 'अधिमूल्‍य'; द्‍यावयाचे पैसे, पिकाचा वाटा, सेवा किंवा अन्‍य कोणतीही वस्‍तूला 'भाडे' म्‍हणतात.  [संपत्ती हस्‍तांतरण अधिनियम १८८२, कलम १०५]


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

Post a Comment