महसूल संबंधित व्‍याख्‍या 31 ते 40

 



३१. 'संबंधित कुळवहिवाट कायदा' म्‍हणजे,

अ) महाराष्ट्र राज्याच्या मुंबई क्षेत्राच्‍या संबंधात- मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम, १९४८;

ब) महाराष्ट्र राज्याच्या हैदराबाद क्षेत्राच्या संबंधात, हैदराबाद कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम, १९५०; आणि

क) महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशाच्या संबंधात, मुंबई कुळवहिवाट शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८. [म.ज.म.अ. कलम २(३०)]

 

३२. 'महसूल अधिकारी' म्‍हणजे म.ज.म.अ. च्‍या कोणत्याही तरतुदींन्वये नेमलेला आणि जमीन महसुलाच्या किंवा भूमापनाच्या, आकारणीच्या, हिशोबाच्या किंवा तत्संबंधी अभिलेखाच्या कामकाजात किंवा कामकाजांच्या संबंधाने नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा प्रत्येक अधिकारी. [म.ज.म.अ. कलम २(३१)]

 

३३. 'महसुली वर्ष' म्‍हणजे, महाराष्‍ट्रासाठी १ ऑगस्‍ट ते ३१ जुलै हे 'महसुली वर्ष' आहे. [म.ज.म.अ. कलम २(३२)]

३४. 'साझा' म्‍हणजे, म.ज.म.अ. कलमअन्वये साझा म्हणून रचना करण्यात आलेल्या तालुक्यातील साधारणत: १ ते १५ गावांचा गट. [म.ज.म.अ. कलम २(३३)]

 

३५. 'साठवणुकीचे यंत्र' (Storage Device) याचा अर्थ, संगणकामध्ये माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक / विद्युत यंत्र, असा आहे. आणि यात, यंत्रसामग्री आज्ञावली (हार्डवेअर सॉफ्टवेअर) या दोन्हींचा समावेश होतो. [म.ज.म.अ. कलम २(३३-अ)]

३६. 'उपविभागीय अधिकारी' म्‍हणजे, जिल्ह्याच्या एका किंवा अनेक उप-विभागांचा कार्यभार ज्याच्याकडे सोपविण्‍यात आला आहे असा सहायक किंवा उप-जिल्हाधिकारी. [म.ज.म.अ. कलम २(३४)]

 

३७. 'भू-मापन क्रमांकाचा पोट-विभाग' म्‍हणजे, भू-मापन क्रमांकाच्या क्षेत्रफळ आणि आकारणीची, भूमि-अभिलेखांत ज्या भू-मापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकानंतर, दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नोंदणी केलेला भाग. [म.ज.म.अ. कलम २(३५)]

 

३८. 'भू-मापन निशाणी' म्‍हणजे, म.ज.म.अ. च्‍या प्रयोजनांसाठी भू-करासंबंधी (कॅडस्ट्रल) भू-मापनाच्या प्रयोजनांसाठी उभारण्यात आलेली निशाणी. [म.ज.म.अ. कलम २(३६)]

 

३९. 'भू-मापन क्रमांक' म्‍हणजे, भूमी-अभिलेखात दर्शक क्रमांक देऊन त्याखाली जमिनीच्या ज्या विभागाचे क्षेत्रफळ आणि आकारणी स्वतंत्रपणे नोंदण्यात आली असेल तो जमिनीचा भाग. आणि त्यामध्ये-

एक) कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही क्षेत्रात अंमलात आलेली अंतिम नगररचना योजना,

सुधारणा योजना किंवा धारण जमिनीच्या एकत्रीकरणाची योजनान्वये पुनर्प्रस्‍थापित भू-खंडाचा (प्लॉटस्) आणि

दोन) नागपूर, वर्धा, चांदा भंडारा या जिल्ह्यांतील खसरा क्रमांक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या, कोणत्याही दर्शक क्रमांकाखाली भूमी अभिलेखात नमूद केलेल्‍या जमिनीच्या कोणत्याही भागाचा समावेश होतो. [म.ज.म.अ. कलम २(३७)]

 

४०. 'वरिष्ठ धारक' म्‍हणजे म.ज.म.अ. प्रकरण १४ खेरीज, इतर भूमिधारकांकडून (ज्यांना कनिष्ठ धारक असे म्हटले आहे) खंड किंवा जमीन महसूल घेण्याचा हक्क ज्या भूमिधारकास आहे तो भूमिधारक असा होतो. मग तो अशा खंडाबद्दल किंवा जमीन महसुलाबद्दल किंवा त्यांच्या कोणत्याही भागाबद्दल राज्य शासनाला जबाबदार असो किंवा नसो. [म.ज.म.अ. कलम २(३८)] 


About the author

Mahsul Guru
Hi, I am Mahsul Guru, a content writer. I’ve always been passionate about writing and blogging. I hope you enjoy my blog posts as much as I enjoy writing it!

إرسال تعليق